लंडन - 2030च्या Fifa World Cup स्पर्धेच्या यजमानपदासाठी इंग्लंडने कंबर कसली आहे. फुटबॉल असोसिएशनचे प्रमुख ग्रेग क्लार्क यांनी 2030च्या स्पर्धा आयोजनासाठी इंग्लंड उत्सुक असल्याची माहिती दिली. या स्पर्धेसाठीच्या बोली प्रक्रियेला अद्याप सुरूवात झाली नसली तरी उरूग्वेनेही स्पर्धा आयोजनासाठी उत्सुकता दर्शवली आहे. 1930 साली पहिला फुटबॉल विश्वचषक उरूग्वे येथे खेळवण्यात आला होता आणि 2030 मध्ये या स्पर्धेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळ उरूग्वे पुन्हा इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी जोमाने प्रयत्न करतील, हे नक्की.
1996 नंतर इंग्लंडमध्ये एकही महत्त्वाची स्पर्धा झालेली नाही. 1966च्या फुटबॉल विश्वचषक आयोजनानंतर 96 मध्ये इंग्लंडमध्ये युरोपियन अजिंक्यपद स्पर्धा झाली होती. त्यामुळे 34 वर्षांनंतर इंग्लंड फिफाची आणखी एक महत्त्वाची स्पर्धा आयोजित करू इच्छितो. क्लार्क म्हणाले,' 2030च्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजनपद मिळवण्यासाठी सरकारनेही सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. यावर चर्चा सुरू आहे आणि 2019 मध्ये याबाबतची घोषणा करण्यात येईल.'