बीजिंग : रशियात सुरू असलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉलचा अंतिम सामना १५ जुलै रोजी इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात खेळला जाण्याची शक्यता असल्याचे भाकित इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड बेकहॅमन याने वर्तविले आहे.विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यातील इंग्लंडची कामगिरी बेकहॅमला प्रभावित करणारी आहे. इंग्लंडने पहिल्या सामन्यात ट्युनिशियावर २-१ ने मात केली. फुटबॉल लीगच्या प्राचारासाठी चीनमध्ये आलेला बेकहॅम म्हणाला,‘माझ्यामते अर्जेंटिना विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध खेळेल. असे झाल्यास यंदा इंग्लंड जेतेपद जिंकेल. मी माझ्या देशाप्रती थोडा पक्षपाती आणि थोडा भावुक आहे.’इंग्लंडने केवळ एकदा १९६६ मध्ये जर्मनीला नमवून विश्वविजेतेपद पटकविले आहे. या संघाची अखेरची सर्वोत्कृष्ट कामगिरी २००६ च्या विश्वचषकाची उपांत्यफेरी गाठणे ही ठरली. त्यावेळी बेकहॅमकडे संघाचे नेतृत्व होते. मॅनचेस्टर युनायटेड आणि रियल माद्रिदचा माजी मिडफिल्डर असलेला बेकहॅम म्हणाला,‘गेरेथ साऊथगेटच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघाला अद्याप बराच पल्ला गाठायचा आहे. गटातील पहिला सामना माझ्या संघाने जिंकल्याचा आनंद आहे, पण अनुभवात माघारल्यामुळे प्रत्येक सामना कठीण असाच आहे. स्पर्धेत अनेक चांगले संघ खेळत असल्याने इंग्लंडने सामन्यागणिक डावपेच आखायला हवे.’
इंग्लंड- अर्जेंटिना यांच्यात अंतिम लढतीची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 3:52 AM