ग्लास्गो : शानदार सांघिक खेळ केलेल्या क्रोएशियाने दमदार विजय मिळवत स्कॉटलँडला ३-१ असे नमवले आणि युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या बादफेरीत स्थान मिळवले. अनुभवी लुका मॉड्रिच याने केलेला शानदार खेळ क्रोएशियाच्या विजयात लक्षवेधी ठरला.
३५ वर्षीय मॉड्रिचने ६२ व्या मिनिटाला संघाचा दुसरा गोल केला. या शानदार विजयासह क्रोएशियाने ड गटातून दुसरे स्थान मिळवत बाद फेरीत प्रवेश केला. सोमवारी कोपेनहेगन येथे ई गटातील उपविजेत्या संघाविरुद्ध क्रोएशियाचा सामना होईल. निकोला व्लासिच आणि इवान पेरिसिच यांनीही प्रत्येकी एक गोल करत क्रोएशियाच्या विजयात योगदान दिले.
तीन वर्षांआधी मॉड्रिचने फिफाच्या सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या किताबावर कब्जा केला होता. त्याने यावेळी एक गोल करताना सामन्यातील तिसरा गोल साकारण्यासाठी अप्रतिम चालही रचली. या सामन्यात मॉड्रिचने एक अनोखा विक्रमही केला असून तो युरो स्पर्धेत गोल करणारा सर्वात युवा, तसेच सर्वात वयस्कर खेळाडूही ठरला आहे. मॉड्रिचने २००८ साली वयाच्या २२व्या वर्षी ऑस्ट्रियाविरुद्ध गोल केला होता आणि आता त्याने ३५व्या वर्षी गोल केला आहे.
इंग्लंडने झेक प्रजासत्ताकला नमवले
रहीम स्टर्लिंग याने केलेल्या सामन्यातील एकमेव गोलच्या जोरावर इंग्लंड संघाने युरो चषक फुटबॉल स्पर्धेत झेक प्रजासत्ताक संघाला १-० असे नमवले. दोन्ही संघांनी याआधीच बाद फेरी निश्चित केल्याने हा सामना औपचारिकतेचा ठरला.