कोपेनहेगन : डेन्मार्कने युरो चषक फुटबॉल स्पर्धेची बाद फेरी गाठताना रशियाचा ४-१ असा एकतर्फी पराभव केला. डेन्मार्कचा स्ट्रायकर जोकिम माहले याने गोल केल्यानंतर कॅमेऱ्यासमोर जात हाताने दहा क्रमांकाचा इशारा केला आणि हा विजय सलामीच्या सामन्यात दुखापतग्रस्त झालेल्या ख्रिस्टियन एरिक्सन याला समर्पित केला.
सलामीच्या सामन्यात डेन्मार्कचा खेळाडू एरिक्सन हृदयाचा झटका आल्याने मैदानातच कोसळला होता. त्या सामन्यासह सलग दोन पराभव पत्करल्याने डेन्मार्कसाठी रशियाविरुद्धचा सामना करो किंवा मरो असा होता. या सामन्यात मोठा विजय मिळवणे डेन्मार्कसाठी अनिवार्य होते आणि त्यांनी त्याप्रमाणेच आक्रमक खेळ करत बाद फेरीत प्रवेश केला. बी गटात दुसरे स्थान मिळवत डेन्मार्कने आगेकूच केली. डेन्मार्क, रशिया आणि फिनलँड यांचे प्रत्येकी ३ गुण झाले, मात्र सरस गोलसरासरीच्या जोरावर डेन्मार्कने आगेकूच करण्यात यश मिळवले.
बेल्जियमची हॅटट्रिक
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या जागतिक क्रमवारीतील अव्वल बेल्जियम संघाने सलग तिसरा विजय मिळवताना युरो चषक स्पर्धेच्या बाद फेरीत धडक मारली. इटली आणि नेदरलँड्सनंतर साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकणारा बेल्जियम तिसरा संघ ठरला. फिनलँडला २-० असे नमवत बेल्जियमने विजयी कूच केली.
फिनलँड पहिल्यांदाच एखाद्या मोठ्या स्पर्धेत खेळत असून त्यांना बी गटात तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर दुसऱ्या सत्रात ७४ व्या मिनिटाला फिनलँडचा गोलरक्षक लुकास राडेकी याच्याकडून चूक झाली आणि त्याच्याकडून स्वयंगोल झाल्याने बेल्जियमला आयती आघाडी मिळाली. लुकाकूने ८१व्या मिनिटाला गोल करत बेल्जियमची आघाडी २-० अशी भक्कम केली.