‘एफसी कोल्हापूर’ महिला आयलीग फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 11:17 AM2019-03-29T11:17:43+5:302019-03-29T11:18:34+5:30
मुंबई येथील कुपरेज मैदानावर सुरू असलेल्या महिला आयलीग पात्रता फेरी फुटबॉल स्पर्धेत एफसी कोल्हापूर सिटी संघाने बॉडीलाईन फुटबॉल क्लब (मुंबई)चा ४-० असा पराभव करीत वूमेन्स आयलीग फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली.
कोल्हापूर : मुंबई येथील कुपरेज मैदानावर सुरू असलेल्या महिला आयलीग पात्रता फेरी फुटबॉल स्पर्धेत एफसी कोल्हापूर सिटी संघाने बॉडीलाईन फुटबॉल क्लब (मुंबई)चा ४-० असा पराभव करीत वूमेन्स आयलीग फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली.
या स्पर्धेत एफसी कोल्हापूर संघाने सलग चार सामने जिंकत ही पात्रता फेरी पार केली. अखेरचा सामना मुंबईच्या बॉडीलाईन फुटबॉल क्लब या संघाबरोबर झाला. प्रथमपासून कोल्हापूर एफसी संघाचे वर्चस्व राहिले. यात अच्युम देवबा हिने पहिल्या गोलची नोंद करीत संघास आघाडी मिळवून दिली.
प्रतिस्पर्धी बॉडीलाईन संघास प्रतिकाराची एकही संधी कोल्हापूर संघाने दिली नाही. सर्वच पातळीवर उत्तम कामगिरी या संघाने करीत, आणखी तीन गोलची नोंद करीत, संघाला ४-० असा निर्वेध विजय मिळवून दिला. एफसी कोल्हापूरच्या प्रतीक्षा मिठारीने एक, तर सुभद्रा साहू हीने दोन गोल केले. अखेरचा हा सामना जिंकत मुख्य स्पर्धेसाठी प्रथमच कोल्हापूर एफसीचा हा संघ पात्र ठरला.
या संघात गुर्मी तमंग (गोलरक्षक), मृणाल खोत, ममता पात्रा, सोनाली साळवी, निमिता गुरूम, पूर्णिमा राव, अदिका भोसले, नौबी कामी, अच्यूम देवबाने, प्रतीक्षा मिठारी, सुभद्रा साहू, पृथ्वी गायकवाड, पुनम मिठारी, प्रियांका मोरे, निशा पाटील, सोनाली सुतार, अर्पिता पोवार यांचा समावेश आहे.
या क्लबची स्थापना आयलीग स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या मुलींना खेळता यावे व कोल्हापूरचे नाव देशभर व्हावे, या उद्देशाने उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी प्रयत्न केले आहेत. या संघाला अमित शिंत्रे, अमित पवार, युवराज पाटील, सूर्यदीप माने या प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले.