सचिन खुटवळकर : बार्सिलोना क्लबकडून खेळताना अद्वितीय, नेत्रदीपक खेळाचे प्रदर्शन करणारा लिओनेल मेस्सी विश्वचषक स्पर्धेत विशेष छाप पाडू न शकल्याने त्याच्यावर टीकाकारांचा रोख होता. मात्र, मंगळवारी नायजेरियाविरुद्ध लौकिकाला साजेसा मैदानी गोल करत मेस्सी फॉर्ममध्ये परतला. पहिल्या दोन सामन्यांत अपयशी ठरलेल्या मेस्सीवर आता सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचवेळी, आइसलँडविरुद्ध एक पेनल्टी किक हुकली, तर मेस्सीला टार्गेट करणाऱ्यांना ख्रिस्तियानो रोनाल्डोने इराणविरुद्ध पेनल्टी किकची संधी दवडल्याचा विसर कसा पडू शकतो, असाही सवाल मेस्सीप्रेमी करत आहेत.
तुलनेने दुबळ्या असलेल्या आइसलँडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात मेस्सीची पेनल्टी किक अडविली गेली. हा सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर क्रोएशियाविरुद्ध ३-0 असा मानहानीकारक पराभव पत्करावा लागल्याने अंतिम १६ संघांमध्येही स्थान न मिळविण्याची नामुष्की अर्जेंटिनावर ओढावतेय की काय, अशी स्थिती निर्माण झाली. मात्र, नायजेरियाविरुद्ध विजय मिळविण्याच्या जिद्दीने मैदानात उतरलेल्या मेस्सी आणि कंपनीने जिगरबाज खेळ करत सामना २-१ असा जिंकला आणि पुढील फेरीतील प्रवेशही निश्चित केला.
मेस्सीने लांब अंतरावरून मिळालेला पास गुढघ्यावर घेऊन चपळपणे नायजेरियाच्या गोलजाळीचा वेध घेत पहिला गोल नोंदविला. या गोलनंतर मेस्सी, त्याचे संघसहकारी, प्रेक्षागारातील दिएगो माराडोना व अर्जेंटिनाच्या पाठिराख्यांनी केलेला जल्लोष मेस्सीसाठी गोल करणे किती निकडीचे होते, हे अधोरेखित झाले. (असाच काहीसा प्रकार ब्राझिलच्या नेयमारच्या बाबतीतही झाला होता.) त्यानंतर नायजेरियाने पेनल्टी किकद्वारे बरोबरी साधल्यानंतर सावध झालेल्या अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटूंनी आणखी चूक करण्याचे कटाक्षाने टाळले.
अर्जेंटिनातर्फे दुसरा गोल करणाऱ्या मार्कोस रोजोने सामना संपल्यानंतर या गोलाचे श्रेय मेस्सीला दिले. यावरून कप्तान म्हणून मेस्सीचे महत्त्व अधोरेखित होते. मैदानात व मैदानाबाहेर उत्तम वर्तनासाठी ओळखल्या जाणाऱ्या मेस्सीचे असंख्य चाहते भारतात आहेत. गोव्यात केवळ मेस्सीसाठी अर्जेंटिनाला पाठिंबा देणारे फुटबॉलप्रेमी आता सुखावले आहेत.