सोची : उरुग्वेविरुद्ध १-२ ने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पोर्तुगाल संघाचे फिफा विश्वकप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या निकालानंतर स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने मात्र आपल्या आंतरराष्ट्रीय भविष्यावर टिप्पणी करण्यास नकार दिला.एडिनसन कवानीच्या दोन गोलनंतर उरुग्वेने शनिवारी फिफा विश्वकप स्पर्धेत अंतिम आठमध्ये स्थान मिळवले. रियल माद्रिदचा स्टार रोनाल्डोला चौथ्यांदा विश्वकप न घेता रित्या हाताने परतावे लागले. पुढील विश्वकप स्पर्धेपर्यंत रोनाल्डो ३७ वर्षांचा होईल. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबाबत भाष्य करण्यास नकार दिला. (वृत्तसंस्था)रोनाल्डो म्हणाला, ‘खेळाडू व प्रशिक्षकांच्या भविष्याबाबत चर्चा करण्याची ही योग्य वेळ नाही.’ युरोपियन चॅम्पियन पोर्तुगाल संघ आत्मविश्वासासह भविष्यात आगेकूच करू शकतो, असेही हा ३३ वर्षीय खेळाडू म्हणाला. रोनाल्डोने सांगितले,‘आमच्याकडे चांगला संघ आहे. संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे संघ मजबूत आहे.’रोनाल्डोने या विश्वकप स्पर्धेत चार गोल नोंदवले.तो सर्वाधिक गोल नोंदवणाऱ्या खेळाडूंच्यायादीत दुसºया स्थानी आहे. इंग्लंडच्या हॅरी केनने पाच गोल नोंदवले आहेत. दरम्यान, पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नांडो सांतोस यांनी रोनाल्डो आंतरराष्ट्रीय फुटबॉल वर्तुळात कायम राहील, अशी आशा व्यक्त केली.
FIFA Football World Cup 2018 : ख्रिस्तियानो रोनाल्डो भविष्याबाबत गप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 2:40 AM