आकाश नेवे : दक्षिण कोरियाने अतिरिक्त वेळेत दोन गोल करत विश्वविजेत्या जर्मनीचे आव्हान फिफा विश्वचषक साखळी फेरीतच संपवले. विश्वविजेत्या संघाला कोणत्याही अधिकृत सामन्यात पराभूत करणारा कोरिया हा पहिला आशियाई संघ ठरला.
फुटबॉलच्या बाबतीत आशियाई संघांना लिंबु टिंबू समजले जाते. त्यात जापान, चीन, इराण आणि कोरिया हेच काय ते काहीसे मजबूत संघ आहेत. मात्र यंदाच्या विश्वचषकात जपान आणि कोरिया या संघांनी मोठीच कामगिरी केली. जापानने कोलंबियाला नमवत विश्वचषकात लॅटिन अमेरिकन संघाला नमवणारा पहिला आशियाई संघ बनण्याचा मान पटकावला. दक्षीण कोरियाने तर बुधवारी झालेल्या या सामन्यात मोठा इतिहासच बनवला.
विश्वविजेते म्हणून मिरवले जाणाऱ्या आणि आपल्या शैलीदार खेळाने भल्याभल्या संघांना नमवणाºया जर्मनीला २-० अशा मोठ्या फरकाने कोरियाने नमवले. आशियाई फुटबॉलच्या बाबतीत हा मोठा विक्रमच मानला जातो. विश्वचषक स्पर्धा सुरू होण्या आधी कोरियाचे रँकिग ५७ होते तर जर्मनीचा संघ पहिल्या स्थानावर होता. कोरियन संघ कोणाच्याही खिजगणतीत नव्हता.
पहिल्या दोन सामन्यातील त्यांच्या कामगिरीनंतर या सामन्यात जर्मनी कोरियावर मोठा विजय मिळवेल, असाच अंदाज बांधला जात होता. मात्र कोरियाच्या संघाने अप्रतिम बचाव करत जर्मनीला गोल करण्यापासून रोखले. अतिरिक्त वेळेत पहिला गोल कॉर्नरवर झाला. त्यावेळी ऑफसाईडच्या शक्यतेने रेफ्रींनी व्हीएआर प्रणालीचा उपयोग केला मात्र ऑफसाईड नसल्याने गोल देण्यात आला. तर दुसरा गोल म्हणजे जर्मनीच्या ढिसाळ खेळावर कोरियाच्या संघाने केलेली मात होती. दुसºया गोलच्या वेळी गोलपोस्टजवळ एकही बचाव फळीतील खेळाडू किंवा गोलकिपर नेअर नव्हता. त्याचा फायदा घेत सोन मियुंग हिन याने गोल केला.