FIFA Football World Cup 2018 : जर्मन लोकांनाच हवाय आमचा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 11:26 PM2018-06-27T23:26:45+5:302018-06-27T23:28:05+5:30
सामन्यापूर्वीच क्रूसने व्यक्त केले होते मत; अंतर्गत वादामुळे एकसंघतेचा अभाव स्पष्ट
चिन्मय काळे : ‘काही जर्मन लोकांनाच आमचा पराभव हवाय. ते पराभवाने खूष होतील.’, हे धक्कादायक मत जर्मनीच्या टोनी क्रूसने सामन्याआधीच वर्तवले होते आणि त्यानंतर जर्मनीचा कोरियाने २-० ने पराभव करीत गतविजेत्यांना विश्वचषकाबाहेर फेकले. अंतर्गत वादाने पोखरलेल्या या जर्मन संघात एकसंघतेचा अभाव असल्याचे सामान्यात स्पष्ट दिसले. तेच या पराभवाचे प्रमुख कारण होते.
फुटबॉल विश्वचषकात धक्कादायक निकाल येतच असतात. त्यातून २०१८ चा विश्वचषकात तर असे अनेक धक्के बसले. पण विश्वचषकाच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा धक्का जर्मनीच्या चाहत्यांना बुधवारी बसला. नाट्यपूर्ण झालेल्या या सामन्यात जर्मनीसारखा बलाढ्य संघ दुबळ्या कोरियासमोर अक्षरश: हतबल झाला होता. मानहानीकारक पराभव होऊन जर्मनीला विश्वचषक इतिहासात पहिल्यांदाच साखळी फेरीत गारद व्हावे लागले. पण या पराभवाचे कारणही संघात अंतर्गत सुरू असलेल्या खदखदीमध्ये दडले आहे.
जर्मनीने विश्वचषकाच्या तोंडावर माजी खेळाडू मिरोस्लाव्ह क्लोसची सह प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. २००२ ते २०१४ या चार विश्वचषकात २४ सामन्यात सर्वाधिक १६ गोल क्लोसच्या नावावर आहेत. त्यामुळे त्याच्या अनुभवाचा संघाला फायदा होईल, अशी आशा होती. पण मुळात क्लोसची नियुक्तीच संघाच्या वादाचे कारण ठरले.
जर्मन संघात सध्या असलेले थॉमस म्युलर, मारियो गोमेझ, मेसुट ओझील, टोनी क्रूस, मॅट्स ह्युमेल्स, सामी खेदीरा या खेळाडूंचे युरोपियन फुटबॉल विश्वात एक वेगळे वलय आहे. हे सर्व खेळाडू प्रशिक्षक ज्योकिम लोव्ह यांच्या खास तंबुतील आहेत. याच खेळाडूंच्या दबावात मिरोस्लाव्ह क्लोसला निवृत्ती घ्यावी लागली होती. २००६ व २०१० चा विश्वचषक गाजविणाऱ्या क्लोसला २०१४ मध्ये फार कमी खेळण्याची संधी लोव्ह यांनी याच खेळाडूंच्या दबावात दिली होती. क्लोससोबतच त्यावेळी संघात असलेला कर्णधार फिलिप ल्हाम, बॅस्टिअन श्वाइनस्टायगर, लुकास पोडोस्की, श्कोर्दन मुस्ताफी यासारख्या मातब्बर खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. या मातब्बर खेळाडूंची संघाकडून आणखी खेळण्याची इच्छा असताना त्यांना निवृत्ती घेण्यास भाग पाडण्यात आले. त्यातून मागील विश्वचषकाच्या अंतिम लढतीत निर्णायक गोल केलेल्या मारिओ गोएट्झला सुद्धा या स्पर्धेसाठी संघातून बाहेर काढण्यात आले.
अशी सर्व स्थिती असताना त्याच क्लोसची सह प्रशिक्षक म्हणून होणारी नियुक्ती वादग्रस्त होणारच. क्लोससारखा मातब्बर खेळाडू सह प्रशिक्षक असूनही म्युलर, गोमेझ, ओझील, क्रूस, खेदीरा ही नवी फळी त्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षणादरम्यान फार ऐकतच नव्हती. विश्वचषकातील सामन्यादरम्यानही क्लोस सह प्रशिक्षक या नात्याने मुख्य प्रशिक्षक लोव्ह यांच्याशी चर्चा करताना कधीच दिसला नाही. सर्व निर्णय लोव्ह स्वत: एकटे घेताना दिसले. या अंतर्गत वादामुळे जर्मनीचा संघ प्रत्यक्ष मैदानावर विस्कळीत दिसला.
अशी सर्व पार्श्वभूमी असल्यानेच कदाचित टोनी क्रूसने ‘पराभवाने जर्मन्सला आनंद होईल’, असे धक्कादायक वक्तव्य केले आणि त्याचे नकारात्मक निकाल लगेच सामन्यात दिसले. संघ अपमानास्पदरित्या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला.