मॉस्को : स्वीडनविरुद्धच्या बरोबरी केली तर जर्मनीच्या संघाचे फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतून पॅकअप जवळपास ठरले होते. त्यामुळे त्यांना विजय मिळवणे क्रमप्राप्त होते. पण निर्धारीत वेळेत मात्र जर्मनीची स्वीडनबरोबर 1-1 अशी बरोबरी होती. जर्मनीला एका गोलची गरज होती. जर्मनीसाठी यावेळी तारणहार ठरला तो टोनी क्रुस. निर्धारीत वेळेनंतर पाचव्या मिनिटालाच क्रुसने अफलातून गोल केला. या गोलने फक्त जर्मनी विजयी ठरली नाही तर चाहत्यांच्या डोळ्याचेही पारणे फिटले.
जर्मनीला सामन्याच्या 94 व्या मिनिटाला फ्रि किक मिळाली होती. ही किक घेण्याचे क्रुसने ठरवले. क्रुसने थेट किक न मारता जवळ असलेल्या आपल्या सहकाऱ्याला पास दिला. त्या सहकाऱ्याने चेंडू पुन्हा क्रुसकडे धाडला. क्रुसने यावेळी अप्रतिम अशी किक मारली आणि चेंडू वळून कधी गोलजाळ्यात गेला हे कुणालाही कळले नाही.