कझान : जपानचा अनुभवी खेळाडू केसुके होंडा याने विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न तेव्हापासून पाहणे सुरू केले होते जेव्हा तो ६ वर्षांचा होता. तेव्हा त्याच्या वडिलांनी जुन्या व्हिसीआरवर ब्राझीलचे महान खेळाडू पेले यांचा व्हिडिओ त्याला दाखवला होता. हा व्हिडिओ पाहून तो खूप प्रेरित झाला होता. आता होंडा याचा हा तिसरा आणि निश्चितपणे अखेरचा विश्वचषक असेल. तो बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरत आहे. मात्र, एसी मिलानच्या या माजी स्टार खेळाडूने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अजूनही आशा सोडलेली नाही. सरावादरम्यान होंडा म्हणाला की, मला जाणवत आहे की माझा हा शेवटचा विश्वचषक आहे. मी ३२ वर्षांचा आहे. चार वर्षे अजून खूप दूर आहेत. त्यामुळेच हा विश्वचषक यशस्वी करण्यासाठी मी सहकाऱ्यांसह प्रयत्न करीत आहे. पेलेंचा व्हिडिओ अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे.दरम्यान, कोलंबियावर जपानने २-१ ने विजय मिळवला होता. होंडा अंतिम २० मिनिटांच्या खेळासाठी मैदानात उतरला होता. आशियाई संघाने दक्षिण अमेरिकन संघावर मिळवलेला हा पहिला विजय होता.
FIFA Football World Cup 2018 : होंडासाठी पेलेंच्या आठवणी ताज्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 4:14 AM