ललित झांबरे : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सोमवारी पोर्तुगालचा सामना इराणशी होणार आहे. हा सामना इराणचे संघप्रशिक्षक कार्लोस क्विरोझ यांच्यासाठी मोठ्या कसोटीचा असेल. या सामन्यात त्यांची मायभूमी महत्त्वाची की कर्मभूमी अशी परीक्षा होईल कारण क्विरोझ हे मुळचे पोर्तुगीज असून त्यांना आपल्याच देशाला नमविण्यासाठी इराणच्या संघाला मार्गदर्शन करावे लागेल. त्यामुळे त्यांचे मन जरी पोर्तुगालने हा सामना जिंकावा असे म्हणत असेल तरी त्यांना काम मात्र पोर्तुगीज संघाला कसे नमविता येईल हे करावे लागणार आहे.
अशी कसोटी द्यावी लागणारे कार्लोस क्विरोझ हे काही पहिलेच प्रशिक्षक नाहीत तर याआधी विश्वचषक स्पर्धेत 19 वेळा प्रशिक्षकाला आपल्याच देशाच्या संघाविरुध्द लढण्याची वेळ आली आहे. यापैकी पाच वेळा हे प्रशिक्षक आपल्या कर्मभूमीला यश देण्यात यशस्वी ठरले आहेत तर 11 वेळा त्यांना आपली मायभूमी जिंकल्याचा आनंद घेता आला आहे. थोडक्यात, या सामन्यांमध्ये कुणीही जिंको अथवा हारो, या प्रशिक्षकांची स्थिती 'विन-विन' राहिली आहे.
हंगेरीचे जोसेफ नेगी असे पहिले प्रशिक्षक होते. 1938 च्या विश्वचषकावेळी त्यांनी स्वीडनच्या संघप्रशिक्षकाची भूमिका पार पाडली होती. त्यावेळी हंगेरीकडून स्विडीश संघ 5-1 असा पराभूत झाला होता.
क्विरोझ यांच्याआधी असेच मायभूमी-कर्मभूमीच्या कोंडीत सापडलेले प्रशिक्षक म्हणजे जर्मनीचा नावाजलेला खेळाडू जुर्गेन क्लिन्समान. 2014 च्या विश्वचषकावेळी क्लिन्समान अमेरिकन संघाचे प्रशिक्षक होते आणि त्यांचा सामना नेमका जर्मन संघाशी झाला. त्यात जर्मनीने 1-0 असा विजय मिळवला होता.ब्राझीलच्या झिको यांनीसुध्दा जपानचे संघप्रशिक्षकपद स्विकारल्यावर त्यांच्या जपानी संघाची विश्वचषक स्पर्धेत नेमकी ब्राझीलशीच गाठ पडली होती. त्यावेळी ब्राझिलीयन असूनही झिकोचा अनूभव जपानला विजय मिळवून देऊ शकला नव्हता.
स्वीडनचे स्वेन गोरान एरिक्सन यांनी 2002 व 2006 मध्ये इंग्लंडच्या संघप्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडली आणि दोन्ही वेळा ना त्यांची जन्मभूमी हरली, ना कर्मभूमी जिंकली....दोन्ही वेळा सामने बरोबरीत सुटले.
यासंदर्भात फ्रान्सच्या ब्रुनो मेत्सू यांच्या नावे विशेष नोंद आहे ती अशी की आपल्या जगज्जेत्या मायदेशाच्या संघाला म्हणजे फ्रान्सला त्यांनी प्रशिक्षित केलेल्या सेनेगलच्या संघाने 2002 विश्वचषकाच्या सलामी सामन्यातच धूळ चारली होती. आता क्विरोझ यांचा अनूभव इराणी संघाला रोनाल्डोचा झंझावात रोखण्यास कितपत कामी येतो याची परीक्षा आहे.