ब्राझील- पेले हे सर्वकालिक महान खेळाडू मानले जातात. त्यांच्या नावावर असलेल्या असंख्य विक्रमांपैकी एक म्हणजे पेले यांनी सर्वात कमी वयात फिफा विश्वचषकाच्या सामन्यात गोल केला होता. हा विक्रम ६० वर्षांनंतरही अबाधित आहे. पेले यांनी १९ जून १९५८ ला स्विडन विरोधात गोल करत हा विक्रम केला होता. त्यावेळी पेले यांचे वय १७ वर्षे २३९ दिवस होते. त्यासोबतच पेले यांनी पुढे पाच दिवसांनी विश्वचषकातील सर्वात कमी वयात हॅट्रिक नोंदवण्याचा विक्रम केला. त्यांनी उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्स विरोधात २४ जून १९५८ रोजी ही हॅट्ट्रिक केली. त्यानंतर अंतिम सामन्यात सर्वात कमी वयात गोल करण्याचा विक्रमही पेले यांनीच केला आहे. त्यांनी १७ वर्षे २४४ दिवस हे वय असताना अंतिम सामन्यात स्विडनविरोधात गोल केला. विश्वचषकात सर्वात कमी वयाचा खेळाडू म्हणून खेळण्याचा मान नॉर्दनआयर्लंडच्या नॉर्मन व्हाईटसाईड याच्या नावावर आहे. स्पेनमध्ये झालेल्या १९८२ च्या विश्वचषकात त्याने पर्दापण केले तेव्हा त्याचे वय १७ वर्षे एक महिना १० दिवस एवढेच होते. तर विश्वचषकात गोल करणारा सर्वात जास्त वयाचा खेळाडू ठरला तो कॅमेरुनचा रॉजर मिल्ला याने ४२ वर्षे ३९ दिवस हे वय असताना १९९४ च्या विश्वचषकात रशियाविरोधात गोल केला होता. रशियात सुरू असलेल्या विश्वचषकात पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डो याने स्पेनविरोधात हॅट्ट्रिक नोंदवली. ३३ व्या वर्षी तो सर्वात जास्त वयाचा हॅट्ट्रिक नोंदवणारा खेळाडू ठरला.
FIFA FOOTBALL World Cup 2018 : सर्वात कमी वयात गोल करण्याचा विक्रम पेले यांच्या नावावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 6:55 AM