कझान - विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत बुधवारी गतविजेत्या जर्मनीला पराभवासह स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. दक्षिण कोरियाने २-० अशा फरकाने जर्मनीचा पराभव केला आणि जर्मनीला साखळीतच स्पर्धेबाहेर जावे लागले. विश्वचषक स्पर्धेत चौथ्यांदा गतविजेत्या संघाला साखळीतच हार मानावी लागली आहे. यापूर्वी फ्रान्स, इटली आणि स्पेन यांना जेतेपद कायम राखण्याच्या शर्यतीत साखळीतच गाशा गुंडाळावा लागला होता.
१९९८ मध्ये फ्रान्सला थिएरी हेन्री , डिब्रिल सिसे आणि डेव्हिड ट्रेझेग्युट ही आघाडीची आक्रमणफळी असूनही २००२ मध्ये पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला नव्हता. त्यांना सेनेगल ( ०-१) आणि डेन्मार्क (०-२) संघानी पराभूत केले होते. २००६ च्या स्पर्धेतील विजेत्या इटलीला २०१० मध्ये स्लोव्हाकियाने (२-३) पराभवाची चव चाखायला लावली होती. तत्पूर्वी, इटलीला पॅराग्वे (१-१) आणि न्यूझीलंडविरूध्द (१-१) बरोबरी स्वीकारावी लागली होती. त्यामुळे त्यांनाही गटातच माघारी परतावे लागले होते. २०१४ मध्ये स्पेनच्या वाट्याला हा अनुभव आला. नेदरलँड्स ( ५-१) आणि चिली ( २-०) यांनी स्पेनचा मार्ग साखळीतच अडवला. बुधवारी जर्मनीचे साखळीत आव्हान संपुष्टात आले.