मॉस्को - रशियाविरुद्धचा पराभव जिव्हारी लागल्यामुळे स्पेनच्या या स्टार खेळाडूने तडकाफडकीने निवृत्ती जाहीर केली. ही आपली अखेरची विश्वचषक स्पर्धा असेल याची जाण त्याला होती, परंतु या प्रवासाचा इतक्या लवकर शेवट होईल असे त्यालाही वाटले नव्हते. स्पेनच्या 2010 च्या विश्वचषक विजयात त्याचा महत्वाचा वाटा होता. रविवारी झालेल्या बाद फेरीच्या लढतीत जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला स्पेन पेनल्टी शूटआऊटच्या थरारात बाद झाला. त्यावेळी 34 वर्षीय आंद्रेस इनिएस्टाच्या डोळ्यांत अश्रु दाटून आले. हा बांध फुटण्याआधी सहकारी पिक्यू जवळ आला आणि त्याने इनिएस्टाला घट्ट मिठी मारली. भरलेल्या नयनांनी त्याने मैदान सोडले.
बार्सिलोना क्लबच्या या माजी खेळाडूने 131 सामन्यांत स्पेनचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यात त्याने 2010च्या विश्वचषक स्पर्धेतील विजयी गोलसह 13 गोल केले आहेत. तसेच 2008 आणि 2012 च्या युरोपियन विजेत्या संघाचाही तो सदस्य होता. रशियाविरूद्धच्या पराभवानंतर त्याने अचानक निवृत्ती जाहीर केली.