फिफा : दर्जेदार आणि वलयांकित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 04:41 AM2018-07-15T04:41:45+5:302018-07-15T04:42:09+5:30
‘फॉर द गेम, फॉर द वर्ल्ड!’ हे आहे फिफा म्हणजेच आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे घोषवाक्य!
-रणजीत दळवी
‘फॉर द गेम, फॉर द वर्ल्ड!’ हे आहे फिफा म्हणजेच आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे घोषवाक्य! याचा अर्थ ‘आम्ही खेळासाठी, आम्ही विश्वासाठी!’ हे सार्थ ठरविताना त्यांनी भूतलावरील हा सर्वांगसुंदर खेळ २१२ देशांमध्ये पोहोचविला तर आहेच, पण त्यांच्या आकडेवारीवरून वयाच्या १८ वर्षांवरील ३० कोटी लोक तो विविध स्तरांवर स्पर्धात्मक स्वरूपात खेळतात. त्यांनी आपल्या विश्वचषक स्पर्धेचे ‘ग्रेटेस्ट शो आॅन अर्थ’ असे जे वर्णन केले, तेही पटण्यासारखे आहे. दर चार वर्षांनी येणारी ही स्पर्धा पाहणाऱ्यांची संख्या अन्य खेळांच्या प्रेक्षकांच्या तुलनेत कैकपटीने जास्त आहे.
फु
टबॉल प्रचार - प्रसाराला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्यापैकी फिफाची दोन मूलभूत तत्त्वे अग्रस्थानी असल्याचे दिसते. पहिले आहे ‘फेअर प्ले’ म्हणजे खिलाडूवृत्ती, ज्याला आपण म्हणू या प्रामाणिकपणे खेळणे. खेळाडूचे मैदानावर, मैदानाबाहेर वागणे. त्याला इतर खेळाडूंविषयी असणारी आस्था, आपुलकी, त्यांच्या प्रति कर्तव्याची भावना, अनुकंपा वगैरे ज्याचे त्याने ‘कम्पॅशनेट’ या एका शब्दात वर्गीकरण केले आहे. यासाठी १९८७ सालापासून खेळाडू किंवा खेळाशी संबंधित एका व्यक्तीला दरवर्षी ‘फेअर प्ले अवॉर्ड’ दिले जाते. गेल्या वर्षी टोगोचा एक राष्ट्रीय खेळाडू फ्रान्सिस कोन याला हा पुरस्कार देण्यात आला होता. त्याने एका क्लब सामन्यात प्रतिस्पर्धी संघाच्या गोलरक्षकाचे प्राण वाचविले होते. त्याला दुसºया खेळाडूची धडक बसली, ते त्याच्या जिवावर बेतू शकते हे फ्रान्सिसच्या झटकन लक्षात आले. बेशुद्ध पडलेला तो गोलरक्षक जीभ गिळणार हे त्याच्या लक्षात येताच त्याने त्याच्या तोंडात हात घालून चक्क जीभ बाहेर ओढली. हे सारे काही क्षणांत घडले. या प्रसंगाव्यतिरिक्त आफ्रिकेत दोनदा आणि थायलंडमध्ये एकदा अशा प्रसंगांतून आणखी तीन खेळाडूंना त्याने संजीवनी दिली आहे.
‘फेअर प्ले’ची व्याख्या तशी बरीच व्यापक आहे. यामध्ये ‘डोपिंग’ म्हणजे उत्तेजके घेण्यापासून खेळाडूंना परावृत्त करण्याचे अथक प्रयत्न सुरू आहेत. फिफा आणि त्यांच्या सहा कॉन्फेडरेशनच्या नियंत्रणाखालील स्पर्धांमध्ये खेळाडूंना विविध चाचण्यांना सामोरे जावे लागते. ‘फेअर प्ले’चे पहिले मानकरी ठरले जपान. आपल्या साखळी लढतीमध्ये कमी पेनल्टी गुण असल्याने त्यांना बाद फेरीत का स्थान मिळाले नाही? अनेकवेळा नियमबाह्य खेळ केल्याने एकाच सामन्यात दोन वेळा पिवळे कार्ड किंवा प्रथम पिवळे व मग लाल मिळाल्याने खेळाडू मैदानाबाहेर जातो. या वेळी जर्मनीला त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागली. जेरोम बोआटेंग या त्यांच्या सेंटर बॅकला स्वीडनविरुद्धच्या विजयामध्ये दोन पिवळ्या कार्डची शिक्षा झाली. यामुळे संपूर्ण संघाला त्याची अनुपस्थिती भरून काढण्यासाठी अधिक कष्ट उपसावे लागले. पुढच्याच सामन्यात जर्मनीला कोरियाविरुद्ध पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे ‘फेअर प्ले’ला आता किती महत्त्व आले हा संदेश सर्वत्र पोहोचल्याने आधीच ‘ब्युटिफुल’ असणारा हा खेळ अधिकच सुंदर व प्रेक्षणीय बनेल!
‘फिफा’चे दुसरे महत्त्वाचे तत्त्व आहे ‘कॉन्स्टन्ट इम्प्रूव्हमेंट’. म्हणजेच सतत खेळामध्ये सुधारणा करण्याचा ध्यास. मुळात या संघटनेकडे पैसा भरपूर प्रमाणात आहे. त्यांच्या तिजोरीत प्रतिवर्षी सहा हजार दशलक्ष डॉलर्स जमा होतात. त्यापैकी ४०% रक्कम विश्वचषकावर खर्च केली जाते. बाकी त्यांच्याकडून संलग्न सहा खंडांच्या शिखर संघटनांना, सदस्य राष्ट्रांनाही अर्थसाहाय्य दिले जाते. आर्थिकदृष्ट्या काहीशा कमजोर राष्ट्रीय संघटनांना साहाय्य केल्यानेच २१२ देश या क्रीडा चळवळीचे भागीदार झाले.
उरुग्वेमध्ये १९३० साली झालेल्या पहिल्या विश्वचषकामध्ये १३ संघांचा समावेश होता. पुढे १९७८पर्यंत ही संख्या १६च्या पलीकडे जाऊ शकली नाही. ‘स्पेन १९८२’मध्ये ती २४ झाली व १९९८च्या फ्रान्समधील स्पर्धेत ती ३२वर गेली. त्यामुळे आशिया व आफ्रिका खंडांना अधिक संधी मिळू लागली. आता २०२६मध्ये हीच संख्या ४८वर जाणार आहे, तेव्हा याचा लाभ आशिया खंडाला किती होतो हे पाहावे लागेल.
दुसरीकडे खेळातील तंत्र सतत विकसित होत असते. गुणवान खेळाडूंवर संस्कार होतात, ते अनेक प्रशिक्षणाशी निगडित उपक्रमांतूनच. अन्यथा पेले, मॅराडोना, मायकेल प्लॅटिनी, योहान क्रायफ, फ्रॅन्झ बेकनबॉअर यांसारख्यांनी अलविदा केल्यानंतर झिको, रोमारिओ, रोनाल्डो, रिव्हाल्डो, रोनाल्डिन्हो, ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, नेमार असे ‘सुपरस्टार’ उदयाला आलेच नसते. खेळ घराघरांत पोहोचविण्यासाठी प्रक्षेपणामध्ये सुधारणा होत असते. प्रक्षेपणात नवे तंत्रज्ञान आल्याने त्याची मदत न्याय करण्यासाठी साह्यभूत ठरते.