मुंबई : काही दिवसांपूर्वीच भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा समाजमाध्यमांवर ट्रोल झाले होते. आता तर इंग्लंडच्या फुटबॉल संघाचा स्टार खेळाडू हॅरी केनने विराटच्या ' त्या ' मेसेजला प्रत्युत्तर दिले होते. विराटने नेमका कोणता मेसेज केनला पाठवला होता, याची उत्सुकता क्रीडा चाहत्यांना आहे.
रशियामध्ये फुटबॉलचा विश्वचषक सुरु आहे. या विश्वचषकात इंग्लंडने पहिल्याच सामन्यात ट्युनिशियाला 2-1 असे पराभूत केले होते. इंग्लंडच्या या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता तो केनने. या सामन्यात इंग्लंडकडून दोन्ही गोल केनने केले होते. या विजयानंतर केनने कोहलीला प्रत्युत्तर दिले आहे.
रशियातील विश्वचषक सुरु असताना कोहलीने केनला ट्विटरवरून एक मेसेज केला होता. या मेसेजमध्ये कोहलीने केनला विश्वचषकासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. या विश्वचषकात तुम्ही यशस्वी ठरो, असे कोहलीने आपल्या मेसेजमध्ये म्हटले होते. सामन्यातनंतर केनने कोहलीला प्रत्युत्तर दिले. यावेळी केन म्हणाला की, " शुभेच्छासाठी धन्यवाद विराट, आमची सुरुवात वाईट झाली नाही. "