कझान : स्ट्रायकर दिएगो कोस्टा याने ५४ व्या मिनिटाला इराणविरुद्ध नोंदविलेला गोल निर्णायक ठरल्याने फिफा विश्वचषकाच्या ब गटात गुरुवारी पहाटे स्पेनने पहिल्या विजयाची चव चाखली. सहकारी खेळाडू इनेस्टाने बॉक्सच्या आतमधून दिलेल्या पासवर कोस्टाने चेंडू अलगद गोलजाळीत ढकलून विश्वचषकात स्वत:चा तिसरा गोल नोंदविला. दुसरीकडे इराणला ८२ व्या मिनिटाला बरोबरी साधण्याची संधी मिळाली होती पण त्यांच्या आक्रमक फळीतील खेळाडूंचा अनुभव कमी पडल्याने अखेर स्पेनने बाजी मारली. निर्धारित ९० मिनिटानंतर पाच मिनिटांच्या इन्जुरी टाइममध्ये इराणने विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, तथापि स्पेनने वेळकाढू धोरण अवलंबताच इराणचे खेळाडू हतबल जाणवले.त्याआधी सुरुवातीच्या ४५ मिनिटांत जवळपास ७६ टक्के चेंडूवर नियंत्रण राखूनही स्पेनला गोल नोंदविण्यात अपयश येताच मध्यांतरापर्यंत सामना गोलशून्यने बरोबरीत होता. स्पेनच्या खेळाडूंनी आठवेळा तर इराणने दोनदा प्रतिस्पर्धी गोलजाळीवर हल्ले केले पण मोक्याच्या क्षणी अपयश येताच गोलपासून वंचित रहावे लागले. दरम्यान स्पेनला दोन तर इराणला एकदा कॉर्नर मिळाला होता. रोनाल्डोच्या हॅट्ट्रिकमुळे पोतुर्गालविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागल्याने स्पेनला इराणविरुद्धच्या लढतीत सर्व काही विसरून विजयासाठीच खेळावे लागले. या लढतीत विजयाव्यतिरिक्त अन्य कोणताही निकाल हा त्यांना साखळी फेरीतच गारद करू शकला असता. यंदाच्या संभाव्य दावेदारांपैकी एक आणि २०१० चे माजी विश्वविजेता असलेल्या स्पेनचा पहिला विजय अखेर कोस्टाने साकारला. इराण सकारात्मक मानसिकतेने मैदानात उतरला होता. पण आक्रमक फळीतील अनुभवाची उणिव त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरली.
FIFA World Cup 2018: स्पेननं इराणवर मिळवला 1-0नं विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 1:39 AM