Fifa World Cup 2018: जगात पहिल्यांदाच झाला 'असा' भूकंप; सुखद धक्क्याने जमीन 'हादरली'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 12:50 PM2018-06-18T12:50:43+5:302018-06-18T13:03:29+5:30
बलाढ्य जर्मनीला नमवणाऱ्या मेक्सिकोच्या संघावर चाहते खूष
मेक्सिको: रविवारी फिफा वर्ल्ड कपमध्ये मेक्सिकोच्या संघानं गतविजेत्या जर्मनीला पराभवाचा धक्का दिला. बलाढ्य जर्मनीवर मेक्सिकोनं धक्कादायक विजय मिळवल्यावर मेक्सिकोमध्ये चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मेक्सिकोच्या फुटबॉल संघाच्या चाहत्यांनी असा काही ठेका धरला की मानवनिर्मित भूकंप झाला. भूकंप मापन करणाऱ्या यंत्रणेनं याची नोंदही केली. मेक्सिकोच्या संघानं गोल डागताच चाहते नाचू लागले आणि भूकंपाची नोंद झाली.
मेक्सिको विरुद्ध जर्मनी हा सामना पाहण्यासाठी फुटबॉल चाहते मेक्सिको सिटीतील प्रसिद्ध एंजल ऑफ इंडिपेंडन्ट्स स्मारकाजवळ गोळा झाले होते. मेक्सिकोचा झेंडा फडकावत ते गाणी म्हणत होते. सामन्याच्या 35 व्या मिनिटाला स्टार खेळाडू हिरविंग लोजानोनं गोल करताच चाहत्यांनी जबरदस्त जल्लोष केला. सर्वच चाहते आनंदाने नाचायला, उड्या मारायला लागले. यावेळी मेक्सिकोत दुपारचे 11 वाजून 32 मिनिटं झाली होती. मेक्सिकोच्या भूगर्भीय संशोधन संस्थेनं यावेळी भूकंपाची नोंद केली. लोजानोनं गोल करताच मेक्सिको सिटीत भूकंपाचा धक्का जाणवला, अशी माहिती भूगर्भीय संशोधन संस्थेनं दिली.
हिरविंग लोजानोनं जर्मनीच्या गोलकिपरला चकवून गोल डागताच एंजल ऑफ इंडिपेंडन्ट्स स्मारकाजवळील चाहत्यांनी 'मेक्सिको, मेक्सिको, मेक्सिको' अशा घोषणा दिल्या. बलाढ्य जर्मनीला धक्का देणारा मेक्सिकोचा संघ पुढील फेरीत नक्की पोहोचेल, असा विश्वास चाहत्यांनी व्यक्त केला. याशिवाय सध्या सोशल मीडियावर मेक्सिकोचा गोलकिपर गुलिमेरो ओचाओ याचंही कौतुक होत आहे.