FIFA World Cup Quarter finals : पेनल्टी शूटआऊटचा थरार क्रोएशियाने जिंकला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 01:36 AM2018-07-08T01:36:16+5:302018-07-08T02:53:47+5:30

पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशिया यजमान रशियाविरूद्ध 4-3 अशी बाजी मारत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

FIFA World Cup Quarter Finals: Now the penalty shootout thunders ... | FIFA World Cup Quarter finals : पेनल्टी शूटआऊटचा थरार क्रोएशियाने जिंकला

FIFA World Cup Quarter finals : पेनल्टी शूटआऊटचा थरार क्रोएशियाने जिंकला

Next
ठळक मुद्दे1998 नंतर क्रोएशियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे आणि त्यांना इंग्लंडचा सामना करावा लागणार आहे.

सोची  -  क्रोएशियाने थरारक लढतीत विजय मिळवून विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.  क्रोएशिया आणि रशिया यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीतील नाट्य 30 मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत कायम राहिल्याने सामना  2-2 असा बरोबरीत राहिला. पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाच्या गोलरक्षक सुबासिचने रशियाचा पहिलाच प्रयत्न अडवला. त्याला प्रत्युत्तर म्हणून रशियाच्या गोलरक्षक अॅकिनफीव्हने क्रोएशियाचा प्रयत्न अपयशी ठरवला. पण पुढच्याच मिनिटाला रशियाच्या फर्नांडेजने संधी गमावली आणि सामन्याचे पारडे क्रोएशियाच्या बाजूने झुकले. इव्हान रॅकिटीचच्या विजयी गोलनंतर क्रोएशियाने 4-3 अशी बाजी मारली. 1998 नंतर क्रोएशियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे आणि त्यांना इंग्लंडचा सामना करावा लागणार आहे.




शंभराव्या मिनिटाला ल्युका मॉड्रीचने कॉर्नरवरून दिलेला चेंडू पेनल्टी क्षेत्रात उभ्या असलेल्या रशियन खेळाडूंमधून जागा बनवत मोठ्या शिताफिने उडी घेत व्हेद्रान कोरल्युकाने हेडरव्दारे गोलजाळीत सुपूर्द केला आणि रशियाच्या आनंदाचा चुराडा झाला. कोरल्युकाच्या त्या गोलने अतिरिक्त वेळेतील पहिल्या सत्रात क्रोएशियाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.


 मध्यंतरानंतर त्यांना केवळ बचावात्मक खेळ करायचा होता आणि त्यात ते यशस्वी ठरले. 112 व्या मिनिटाला क्रोएशियाच्या डॅनियल सुबासिचने केलेला अविश्वसनीय बचाव रशियाचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी पुरेसा ठरणारा होता. मात्र, सामन्यातील नाट्य अजून संपले नव्हते. 115व्या मिनिटाला पेनल्टी बॉक्सवरून मिळालेल्या फ्री किकवर मारियो फर्नांडेजने हेडरव्दारे गोल करून सामना 2-2 अशा बरोबरीत आणला.

 

विश्वचषक फुटबॉलच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत क्रोएशियाने पिछाडीवरून मुसंडी मारताना यजमान रशियाला पहिल्या सत्रात 1-1 असे बरोबरीत रोखले होते. उपांत्यपूर्व फेरीत आक्रमक सुरूवात करून पहिला गोल नोंदवून आघाडी घेण्याच्याच रणनितीने दोन्ही संघ मैदानात उतरले होते. त्यामुळे सुरूवातीपासूनच सामन्यावर नजर खिळून राहिली. धक्कातंत्र देत इथवर धडकलेल्या क्रोएशियाने चेंडूवरील ताबा आणि अचुकतेच्या बाबतीत रशियापेक्षा वरचढ खेळ केला. मात्र डेनीस चेरिशेव्हच्या अप्रतिम गोलने क्रोएशियाची एकाग्रता भंग केली. योग्य ताळमेळ आणि निर्णयक्षमता याच्या जोरावर चेरिशेव्हने पेनल्टी क्षेत्राबाहेरून क्रोएशियाच्या दोन बचावपटूंना चकवत सुरेख गोल केला. चेरिशेव्हने टोलावलेल्या चेंडूच्या दिशेचा गोलरक्षकाने अंदाज बांधण्याआधीच हा गोल झाला होता. त्यानंतर क्रोएशियाच्या खेळाडूंचे मनोबल खचले आणि त्यांच्याकडून फाउल झाले. पण 39व्या मिनिटाला आंद्रेज क्रॅमनीचच्या हेडरव्दारे केलेल्या गोलने क्रोएशियाने बरोबरी साधली. क्रोएशियाच्या या पलटवाराने रशियाचे प्रशिक्षक प्रचंड वैतागले.  



दुस-या सत्रात दोन्ही संघांनी संयमाने खेळ केला. कोणतीही घाई अंगलट येऊ शकते याची कल्पना असल्याने दोन्ही संघ सावध खेळावर भर दिलेला. अधुनमधुन आक्रमण करत होते, बचावपटूंच्या सुरेख खेळासमोर त्यांना यश मिळवता येत नव्हते. सामन्याच्या 60व्या मिनिटाला क्रोएशियाची आघाडी थोडक्यात हुकली. रशियन पेनल्टी क्षेत्रात क्रोएशियाच्या खेळाडूंनी केलेल्या आक्रमणाने गोलरक्षक अॅकिनफिव्हलाही पुढे येण्यास भाग पाडले. हीच संधी हेरून इव्हान पेरिसीचने चेंडू शितीफीने गोलजाळीच्या दिशेने तटवला. पण, क्रोएशियाचे नशीब खराब असल्याने चेंडू गोलपोस्टवर आदळून माघारी फिरला. यावर क्रोएशियाच्या खेळाडूंसह प्रशिक्षकांना विश्वास बसेनासा झाला. तर रशियाच्या खेळाडूंनी सुटकेचा निश्वास टाकला. 


त्यानंतर बराच काळ रशियाचे खेळाडू दबावाखाली दिसले. तरीही त्यांनी यजमानांना साजेसा खेळ केला. पण अखेरच्या दहा मिनिटात त्यांच्यावरील दडपण अधिक वाढले. क्रोएशियाचा खेळ वरचढ ठरत असताना प्रेक्षक रशियाच्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्याचे काम करत होते. खेळांडूपेक्षा रशियाचे प्रशिक्षक प्रचंड तणावात दिसले. पण दोघांनी संयमाने खेळ केला. निर्धारीत वेळेतही 1-1 अशा बरोबरीत सुटली. अतिरिक्त पाच मिनिटांत कोणालाही विजयी गोल करता आला नाही. 

Web Title: FIFA World Cup Quarter Finals: Now the penalty shootout thunders ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.