हीरो ठरले झीरो
By प्रसाद लाड | Published: July 15, 2018 04:49 AM2018-07-15T04:49:30+5:302018-07-15T04:49:51+5:30
महिनाभर सारे जग फुटबॉलमय झाले. सगळीकडे विषय फुटबॉलचाच. पण विश्वचषक सुरू होण्यापूर्वी मात्र सर्वांच्या मुखी फक्त तीन खेळाडूंचीच नावे होती.
महिनाभर सारे जग फुटबॉलमय झाले. सगळीकडे विषय फुटबॉलचाच. पण विश्वचषक सुरू होण्यापूर्वी मात्र सर्वांच्या मुखी फक्त तीन खेळाडूंचीच नावे होती. ती म्हणजे रोनाल्डो, मेस्सी आणि नेमार. ही त्रिमूर्ती विश्वचषकात काय रंग दाखवते, याची साऱ्यांना उत्सुकता होती. पण या तिघांनाही विश्वचषकात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही; आणि त्यामुळेच फुटबॉलच्या क्षितिजावरचे हे हीरो ठरले झीरो, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
रोनाल्डोने विश्वचषकाची सुरुवात झोकात केली होती. स्पेनविरुद्धच्या लढतीत रोनाल्डोने महत्त्वाची भूमिका बजावली. हॅट्ट्रिकसह त्याने संघाला पराभवापासून वाचवले. पण यानंतर रोनाल्डोला फक्त एकच गोल करता आला. त्याचबरोबर धसमुसळा खेळ केल्याने त्याला दोन वेळा पिवळे कार्डही देण्यात आले.
मेस्सीची जादू चालणार का... असे बºयाचदा विश्वचषकापूर्वी आपण ऐकले होते. पण मेस्सीला जादू तर दूरच साधी कामगिरीही चोख निभावता आली नाही. या विश्वचषकात त्याला फक्त एकच गोल करता आला. गेल्या विश्वचषकात त्याने चार गोल केले होते, संघाला तो अंतिम फेरीत घेऊन गेला होता. पण या वर्षी मेस्सीची जादू काही दिसली नाही.
नेमारला या विश्वचषकात दोनच गोल करता आले. २०१४ साली झालेल्या विश्वचषकात त्याने चार गोल केले होते. त्यामुळे या दोन्ही गोष्टी पाहिल्या तर नेमारचा खेळ गेल्या विश्वचषकाच्या तुलनेने या वेळी खालावला. या विश्वचषकात नेमार आपल्या गोलसाठी नाही, तर अभिनयासाठी चांगलाच लक्षात राहिला आहे. सोशल मीडियावर तो ट्रोलही झाला.
नावाजलेल्या खेळाडूंना प्रतिस्पर्धी संघ सर्वप्रथम रडारवर घेतो. हे त्या खेळाडूंनाही माहिती असते. पण तरीदेखील काहीतरी वेगळी रणनीती या तिन्ही खेळाडूंकडून दिसली नाही. आपल्या जोरावरच संघ जिंकू शकतो, अशी त्यांची भूमिका होती. जेव्हा एखादा खेळाडू संघापेक्षा मोठा ठरतो, तेव्हा सारी गडबड होते. त्या वेळी त्या खेळाडूने तरी देदीप्यमान कामगिरी करावी किंवा अन्य खेळाडूंना पुढे आणायचे असते. या दोन्ही गोष्टी या तिन्ही खेळाडूंच्या बाबतीत दिसल्या नाहीत. या खेळाडूंची चर्चा जास्त क्लबसाठीच रंगते. या तिघांनी जरा देशाचाही विचार केला असता तर कदाचित वेगळे चित्र आपल्यासमोर असले असते.