भारताने बांगलादेशला नमविले, कर्णधार सुनील छेत्रीचा शानदार खेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 04:52 AM2021-06-08T04:52:12+5:302021-06-08T04:52:39+5:30
Football : प्रदीर्घ कालावधीपासून विजयाची चव चाखण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या भारतीय संघाने या लढतीत सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले.
दोहा : दिग्गज सुनील छेत्रीच्या शानदार खेळाच्या जोरावर भारताने फिफा विश्वकप २०२२ आणि आशियाई कप २०२३च्या संयुक्त क्वाॅलिफायर लढतीत सोमवारी येथे बांगलादेशचा २-०ने पराभव करीत स्पर्धेत पहिला विजय नोंदवला. या निकालामुळे भारतीय संघाची आशियाई क्वाॅलिफायरच्या तिसऱ्या फेरीत थेट प्रवेश मिळविण्याच्या आशा बळावली.
प्रदीर्घ कालावधीपासून विजयाची चव चाखण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या भारतीय संघाने या लढतीत सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. संघाने सुरुवातीला गोल करण्याच्या काही संधी गमावल्या; पण ७९व्या मिनिटाला छेत्रीच्या हेडरने संघाचे खाते उघडले. भारतीय कर्णधाराने अखेरच्या क्षणी (९० अधिक दोन मिनिट) एक आणखी गोल नोंदवत संघाचा २-० ने विजय निश्चित केला. या दोन गोलमुळे छेत्रीची आंतरराष्ट्रीय गोलची संख्या ७४ झाली आहे. या विजयामुळे भारतीय संघाचे सहा सामन्यांत ७ गुण झाले असून, संघ गटतालिकेत तिसऱ्या स्थानी दाखल झाला आहे.