भारत बांगलादेशविरुद्ध विजयासाठी उत्सुक; ... तर सहा वर्षांत भारताचा हा पहिला विजय ठरेल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 05:29 AM2021-06-07T05:29:21+5:302021-06-07T05:29:55+5:30
Football : भारत विश्वकप स्पर्धेत स्थान मिळविण्याच्या शर्यतीतून यापूर्वीच बाहेर फेकल्या गेला आहे, पण २०२३ च्या आशियाई कपसाठी भारताच्या आशा कायम आहेत.
दोहा : भारतीय फुटबॉल संघ सोमवारी येथे होणाऱ्या विश्व कप व आशिया कप संयुक्त क्वालिफायर लढतीत शेजारी देश बांगलादेशविरुद्ध सकारात्मक निकाल मिळविण्यासाठी उत्सुक असेल. जर भारतीय संघाला या महाद्वीपीय स्पर्धेच्या क्वालिफाइंग प्ले-ऑफ फेरीत खेळण्याची नामुष्की टाळण्यासाठी त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये विजय मिळवावा लागेल. कारण अद्याप त्यांच्या नावावर एकाही विजयाची नोंद नाही.
भारत विश्वकप स्पर्धेत स्थान मिळविण्याच्या शर्यतीतून यापूर्वीच बाहेर फेकल्या गेला आहे, पण २०२३ च्या आशियाई कपसाठी भारताच्या आशा कायम आहेत. सहा सामन्यांत केवळ तीन गुणांसह भारत ई गटात चौथ्या स्थानी कायम आहे. भारताने अद्याप आशिया कप क्वालिफायरच्या तिसऱ्या फेरीत स्थान निश्चित केलेले नाही.
सोमवारी जर भारताने विजय मिळवला तर विश्व कप क्वालिफायरमध्ये सहा वर्षांत भारताचा हा पहिला विजय ठरेल. यापूर्वी भारताने नोव्हेंबर २०१५ मध्ये विजय मिळवला होता. त्यावेळी बेंगळुरूमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत (२०१८ विश्व कप क्वालिफायर) भारताने गुआमविरुद्ध १-० ने विजय मिळवला होता.
प्रशिक्षक स्टिमक गुरुवारी आशियाई चॅम्पियन कतारविरुद्ध ०-१ ने पत्कराव्या लागलेल्या पराभवामुळे निराश नसतील. कारण १८ व्या मिनिटांपासून भारतीय संघ १० खेळाडूंसह खेळत होता. त्यामुळे संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळाली होती. कारण मार्च महिन्यात संयुक्त अरब अमिरातविरुद्ध आंतरराष्ट्रीय मैत्री सामन्यात भारताला ०-६ ने पराभव स्वीकारावा लागला होता.
भारतीय संघ मानांकनामध्ये १०५ व्या स्थानी तर बांगलादेश संघ १८४ व्या स्थानी आहे. त्यामुळे भारताचे पारडे वरचढ असेल. भारताने विश्वकप क्वालिफाईंग राऊंडमध्ये दोनवेळ बांगलादेशचा पराभव केला आहे, पण हे विजय १९८५ मध्ये मिळविलेले आहेत. बांगलादेशच्या खात्यावर दोन गुण असून ते गटात तळाच्या स्थानी आहे. त्यांनी अफगाणिस्तानला १-१ ने बरोबरीत रोखले होते.
सामना : भारतीय वेळेनुसार रात्री ७.३० पासून.
भारतीय संघ :- गुरप्रीत सिंग संधू, अमरिंदर सिंग, धीरज सिंग, प्रीतम कोटल, राहुल भेके, नरेंदर गहलोत, चिंग्लेनसाना सिंग, संदेश झिंगन, आदिल खान, आकाश मिश्रा, सुभाशीष बोस, उदांता सिंग, ब्रँडन फर्नांडिज, लिस्टन कोलासो, रॉलिन बोर्जेस, ग्लॅन मार्टिन्स, प्रणय हलदर, सुरेश सिंग, राल्टे, यासिर मोहम्मद, चांगते, बिपिन सिंग, करूनियान, इशान पंडिता, सुनील छेत्री आणि मनवीर सिंह.