मुंबई - भारताच्याफुटबॉल संघांनी दोन वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धांमध्ये सोमवारी मैदान गाजवले. भारताच्या 16 वर्षांखालील संघाने आशियाई विजेत्या इराकचा 1-0 असा पराभव केला, तर 20 वर्षांखालील संघाने माजी विश्वविजेत्या अर्जेंटिनावर 2-1 अशी मात केली. वेस्टर्न एशिया फुटबॉल फेडरेशनच्या 16 वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धेत भारताने भुवनेशने 84 व्या मिनिटाला नोंदवलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर आशियाई विजेत्या इराकला 1- 0 अशी हार मानण्यास भाग पाडले. कोणत्याही वयोगटात भारताने इराकवर मिळवलेला हा पहिलाच विजय आहे. भारताने या सामन्यात वर्चस्व गाजवताना गोल करण्याच्या 10 संधी निर्माण केल्या. भारताला पुढील सामन्यात येमेनचा सामना करावा लागणार आहे. सामना पाहण्यासाठी पाहा हा व्हिडीओभारताच्या 20 वर्षांखालील संघाने स्पेनमध्ये सुरू असलेल्या कोटीफ कप स्पर्धेत अर्जेंटिनावर 2-1 अशा ऐतिहासिक विजय मिळवला. फ्लॉइड पिंटो यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणा-या भारतीय संघाला म्युरसिया (2-0) आणि मॉरिटॅनिया (3-0) यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता, तर त्यांनी व्हेनेझुएलाला गोलशुन्य बरोबरीत रोखले होते. मात्र, सोमवारी त्यांनी सहा वेळा 20 वर्षांखालील विश्वचषक उंचावणा-या अर्जेंटिनाला नमवून भारतीय चाहत्यांना सुखद धक्का दिला. दीपक तांग्री (4 मि.) आणि अन्वर अली (68 मि.) यांनी भारतीयांसाठी गोल केले.