चाकोरी मोडून हजारो मुलींना दाखवली दिशा; तनाज तुझ्यावर 'नाज' आहे!

By स्वदेश घाणेकर | Published: April 15, 2019 10:00 AM2019-04-15T10:00:24+5:302019-04-15T10:01:49+5:30

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे... हातावर हात ठेवून परिस्थिती बदलेल याची प्रतीक्षा करण्यापेक्षा ती बदलण्यासाठी स्वत: झटणे गरजेचे आहे.

Inspirational story of Tanaz Hassan Mohammad; the football lover girl who gave direction of many girls | चाकोरी मोडून हजारो मुलींना दाखवली दिशा; तनाज तुझ्यावर 'नाज' आहे!

चाकोरी मोडून हजारो मुलींना दाखवली दिशा; तनाज तुझ्यावर 'नाज' आहे!

Next

- स्वदेश घाणेकर

मुंबई : केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे... हातावर हात ठेवून परिस्थिती बदलेल याची प्रतीक्षा करण्यापेक्षा ती बदलण्यासाठी स्वत: झटणे गरजेचे आहे. समाजाने आखलेल्या चौकटीत आपली घुसमट होत असेल, तर ती चौकट मोडून काही समाजोपयोगी कार्य केलं तर एकाचे दोन आणि दोनाचे हजारो हात मदतीला येतात. पण ती सुरुवात होणे गरजेचे आहे. 

मुंबईच्या वांद्रे येथील मुस्लीमबहूल भागात तिचा जन्म... तिला लहानपणापासून चौकटी बाहेर विचार करण्याची शिकवण मिळाली. हो पण ते करताना समाजाची उन्नतीच डोळ्यासमोर ठेवण्याचे तिला सांगण्यात आले होते. वडील स्थानिक स्तरावरील क्रिकेटपटू आणि आई शिक्षिका, त्यामुळे मुलींसाठी परंपरागत चालत आलेल्या रुढींची सक्ती तिच्यावर कधी झाली नाही. तिनेही कुटुंबीयांच्या पाठिंब्याचा गैरफायदा घेतला नाही आणि आज ती हजारो मुलींची प्रेरणास्थान बनली आहे. तिच्या नावातच 'नाज' असल्याने कुटुंबीयांना तिचा अभिमान वाटतो. तनाज हसन मोहम्मद असे या युवतीचे नाव...

 
वांद्रे येथे जन्मलेल्या तनाजला लहानपणापासूनच क्रीडा क्षेत्राची आवड. वडिलांकडून तसे बाळकडू तिला मिळाले. म्हणून तिने क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला. हॉकी आणि फुटबॉल हे तिचे आवडते खेळ. त्यातल्यात्यात फुटबॉल हा अधिक जवळचा. MMK महाविद्यालयातून पदवी मिळवल्यानंतर तिने स्पोर्ट्स मॅनेजमेन्टचा ( क्रीडा व्यवस्थापन) अभ्यास केला आणि त्याची पदवी मिळवली. पण आपल्याला संधी मिळाली तशी अन्य मुलींना मिळतेच असे नाही. मग मिळवलेल्या पदवीचा समाजाच्या चाकोरीत अडकलेल्या मुलींच्या शिक्षणासाठी उपयोग करून घ्यावा हा निर्धार तिने केला. 


"क्रीडा क्षेत्रात कारकीर्द करता येते हे आजही अनेकांना माहीत नाही. त्यात मुलींना अजूनही चौकटीचं जगणं जगाव लागत. मग अशा मुलींना घराबाहेर काढून खेळाच्या माध्यमातून त्यांचा विकास करायचा आणि त्यांच्या घरच्यांचे मतपरिवर्तन करायचे मी ठरवले," असे तनाज सांगते. ब्रिटिश काउन्सिलच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या फुटबॉल प्रशिक्षकांचा प्रीमिअर स्कील लायसन्स तिने मिळवला आणि ग्रास रूट प्रोग्रॅमिंगच्या माध्यमातून 12 वर्षांखालील मुला-मुलींना फुटबॉल प्रशिक्षण ती देऊ लागली. हा प्रवास सहज अजिबात नव्हता. विरोध झाला, पण घरच्यांचा पाठिंबा आणि सकारात्मक विचार या दोन अस्त्रांच्या जोरावर तिने सर्व अडथळे पार केले.


ती सांगते,"इतरांच्या मुलींना या क्षेत्रात आणण्यासाठी प्रथम मला स्वतःला समोर आणावे लागले. मीही एक मुलगी आहे आणि फुटबॉल खेळू शकत. हे जेव्हा अनेकांना समजले तेव्हा विरोधाची धार बोथट होत गेली. आधी आपल्याला स्वतः आदर्श म्हणून बनावं लागतं मग अनेकांना आपसूकच प्रेरणा मिळते. आज हजारो मुली फुटबॉल खेळत आहेत. त्याही अन्य मुलींसमोर आदर्श ठेवत आहेत. त्यामुळे समाजकल्याणाचं हे रोप वाढतच चाललं आहे आणि त्याचा वटवृक्ष होणार."


तनाज ही मुंबई सिटी फुटबॉल क्लबच्या ग्रास रूट प्रोग्राममध्ये काम करते. 2017 साली त्यांनी मदनपुरा भागात शिबीर घेतले होते, परंतु केवळ मुलच फुटबॉल खेळायची. तिने तेथील लोकांना त्यांच्या मुलींना फुटबॉल खेळण्यासाठी पाठवण्यास सांगितले. तिचे मुद्दे स्थानिकांना पटले आणि 500-600 मुलींनी सुरुवातीला सहभाग घेतला. समाजाचे आपण देणे लागतो, ही जाण ठेवून ती मुलींना चौकटी बाहेर विचार करण्यास सांगत आहे. भारतीय क्रीडा व्यवस्थापन क्रांती घडवण्याचा तिचा निर्धार आहे.



Web Title: Inspirational story of Tanaz Hassan Mohammad; the football lover girl who gave direction of many girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.