आयएसएल फुटबॉल स्पर्धा आजपासून रंगणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 01:58 AM2020-11-20T01:58:40+5:302020-11-20T01:59:02+5:30
लॉकडाऊननंतर देशात पहिले मोठे आयोजन
बॅम्बोलिम (गोवा) : रिकाम्या स्टेडियममध्ये कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करीत आज शुक्रवारपासून येथे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेचे आयोजन होत आहे. लॉकडाऊननंतर गेल्या आठ महिन्यात देशात सुरू होत असलेली ही पहिलीच मोठी स्पर्धा असेल. नोव्हेंबर ते मार्च अशी पाच महिने चालणारी ही स्पर्धा कोरोना प्रकोपामुळे गोव्यात आयोजित होत आहे. सहभागी ११ फ्रॅन्चाईजी संघांची तीन गटात विभागणी करण्यात आली असून अ गटात चार तर ब आणि क गटात प्रत्येकी तीन संघांना स्थान देण्यात आले आहे.
येथील जीएमसी स्टेडियममध्ये स्पर्धेच्या सुरुवातीला माजी चॅम्पियन एटीके मोहन बागान आणि केरळ ब्लास्टर्स यांच्यात सामना खेळला जाईल. ही लढत रोमहर्षक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तथापि, यंदाच्या मोसमातील सर्वांत मोठा सामना आगामी २७ नोव्हेंबर रोजी एटीके मोहन बागान आणि एससी ईस्ट बंगाल या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघात खेळला जाईल. शंभर वर्षांहून जुनी असलेली कडवी प्रतिस्पर्धा येथे नव्या रूपात अनुभवायला मिळेल, यात शंका नाही. मागच्या वर्षीचा आयएसएल विजेता एटीके आणि आय लीग चॅम्पियन मोहन बागान यांच्या विलिनीकरणातून एटीके मोहन बागान संघ तयार झाला असून हा संघ प्रबळ दावेदार म्हणूृन सुरुवात करणार आहे. या संघाने भारताचा स्टार खेळाडू संदेश झिंगनसारख्या काही दिग्गजांना करारबद्ध केले आहे. यात फिजीचा खेळाडू रॉय कृष्णा याचादेखील समावेश आहे. त्याने मागच्या सत्रात २१ सामन्यात १५ गोल करीत सर्वाधिक गोल नोंदविणाऱ्या खेळाडूंमध्ये संयुक्त दुसरे स्थान पटकविले होते. कोच ॲन्टेनियो हबास यांनी रॉयसह स्पेनचा मिडफिल्डर एडू गार्सिया, भारताचा प्रीतम कोटल, अरिंदम भट्टाचार्य आणि झिंगण हे संघाची ताकद असल्याचे म्हटले आहे.
मागच्या सत्रात साखळी फेरी जिंकून एएफसी चॅम्पियन लीगची पात्रता गाठणाऱ्या एफसी गोवाने स्टार फॉरवर्ड फेरान कोरोमिनास आणि ह्युगो बोमस या दोघांना यंदा गमावले. हे दोन्ही खेळाडू गेल्या काही वर्षांत आयएसएलमध्ये सर्वाधिक गोल नोंदविणाऱ्या खेळाडूंच्या यादीत होते.
आघाडीचे भारतीय तसेच मोजके विदेशी खेळाडू असलेला कार्ल्स कुऑड्रेट यांच्या मार्गदर्शनाखालील माजी चॅम्पियन बँगलोर एफसीदेखील जेतेपदाच्या चढाओढीत कायम आहे. २०१८-१९ ला विजेतेपदाचा मान मिळविणाऱ्या संघातील अनेकांना कायम राखण्यात कुऑड्रेट यशस्वी ठरले. या संघात दोनवेळेचा गोल्डन ग्लोव्हज विजेता गुरुप्रीतसिंग संधू, नंबर वन सुनील छेत्री, युआनन, एरिक पार्तालू आणि डेलगाड यांच्यावर अनेकांची नजर असेल. मुंबई सिटी संघदेखील प्ले-ऑफमध्ये धडक देण्यास उत्सुक आहे. संघाचे कोच सर्जियो लोबेरा यांच्या मार्गदर्शनाचा त्यांना लाभ होईल. लोबेरा हे एफसी गोवा सोडून मुंबईचे कोच बनले. गोवा संघाने २०१८ च्या सत्रात अंतिम फेरी गाठली होती. लिव्हरपूलचे दिग्गज फाऊलर यांच्या मार्गदर्शनात खेळणारा नवा संघ स्पोर्टिंग क्लब ईस्ट बंगाल आणि आयएसएलचा दोन वेळेचा चॅम्पियन चेन्नईयन एफसी या संघांकडूनही धडाकेबाज कामगिरीची अपेक्षा बाळगता येईल.