बार्सिलोना क्लबचा कर्णधार लिओनेल मेस्सीनं सलग तिसऱ्या वर्षी युरोपियन गोल्डन बूट पुरस्कार जिंकला. 2018-19 या हंगामातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ठरलेल्या मेस्सीनं 34 ला लिगा सामन्यांत 36 गोल्स केले आहेत. शिवाय त्यानं स्पॅनिश लीग चषक ( कोपा डेल रे) स्पर्धेत तीन आणि युएफा चॅम्पियन्स लीगमध्ये 12 गोल केले आहेत. अर्जेंटिनाच्या या दिग्गज फुटबॉलपटूनं मागील हंगामात एकूण 51 गोल्स केले आहेत.
मेस्सीनं एकूण सहाव्यांदा हा मान पटकावला आहे आणि यंदा त्यानं गोल्डन बूट जिंकण्याची हॅटट्रिक पूर्ण केली. मेस्सीनं यापूर्वी 2010, 2012, 2013, 2017, 2018 मध्ये गोल्डन बूट पुरस्कार जिंकला होता. रोनाल्डोला चार वेळा ( 2008, 2011, 2014, 2015) हा पुरस्कार देण्यात आला आहे.
युरोपियन गोल्डन बूट पुरस्कार पटकावणारा मेस्सी हा जगातला पहिलाच खेळाडू आहे. त्यानंतर रोनाल्डो ( चारवेळा), गेर्ड म्युलर, एसेबीओ, थिएरी हेन्री आणि लुईस सुआरेझ यांनी प्रत्येकी दोनवेळा हा पुरस्कार जिंकला आहे.