नेपोलीने सहाव्यांदा जिंकला ‘इटालियन चषक’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 12:43 AM2020-06-19T00:43:49+5:302020-06-19T00:43:56+5:30
रोनाल्डोला पेनल्टीची संधीही मिळू शकली नाही
रोम : ख्रिस्टियानो रोनाल्डो याला पेनल्टीची संधी मिळण्याआधीच नेपोली संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये युवेंटस्चा ४-२ असा पराभव करीत बुधवारी सहाव्यांदा इटालियन चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली.
प्रेक्षकांविना झालेल्या अंतिम सामन्यात रोनाल्डोला संधी मिळण्याआधी आर्काडीज मिलिक याने नेपोलीकडून निर्णायक गोल नोंदवला.
त्याआधी निर्धारित वेळेत उभय संघ गोलशून्यने बरोबरीत होते. विक्रमी १३ वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या युवेंटस्कडून रोनाल्डोला अखेरची पेनल्टी घ्यायची होती, पण त्याआधी पावलो डायबेला याचा शॉट गोलकीपरने रोखला.
डॅनिलोचा शॉटदेखील क्रॉसबारच्या वरून निघून जाताच पाचवेळा फिफाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार विजेता खेळाडू रोनाल्डो हतबलपणे पाहत राहिला. तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर इटलीत मागच्या महिन्या अखेर पुन्हा फुटबॉलला सुरुवात झाली होती. (वृत्तसंस्था)