पणजी : ‘आयएसएल’चा अंतिम सामना गोव्यातील फातोर्डा स्टेडियमवर खेळविण्यात आला. फुटबॉल हा राज्य खेळ असलेल्या गोव्यातील या स्टेडियमची प्रेक्षकसंख्या २० हजारांहून अधिक आहे. त्यामुळे देश-विदेशांतील चाहते गर्दी करतील, असा विश्वास आयोजकांना होता. म्हणून त्यांनी फायनलसाठी या मैदानाची निवड केली. मात्र, कोरोना व्हायरसमुळे सामना प्रेक्षकांविना खेळविण्यात आला. यावर फुटबॉलप्रेमींबरोबरच यंदाचा चॅम्पियन ठरलेल्या एटीके कोलकाता संघाचे प्रशिक्षक अॅन्टोनिया हब्बास यांनीही दु:ख व्यक्त केले.
प्रेक्षकांविना खेळण्याचा तुमचा अनुभव कसा होता, या प्रश्नावर अब्बास यांनी थोडा दम धरला. ते म्हणाले, फुटबॉल आणि चाहते हे अत्यंत जवळचे समीकरण आहे. खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचे काम प्रेक्षकच करीत असतात. प्रेक्षकांचा आवाज सतत कानावर पडत असतो. अशा तुडुंब भरलेल्या वातावरणात खेळण्याची मजाही वेगळीच असते. आज मात्र चित्र वेगळे होते, याची आम्हाला कल्पना असली तरी काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. प्रेक्षकांविना खेळणे हे दुर्दैवी ठरले. मात्र, खेळाच्या पलीकडेही लोकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरोनाची भीती पसरली आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन त्याला सामोरे जायला हवे.
दरम्यान, हब्बास यांच्या मागदर्शनाखाली एटीके कोलकाताने दुसऱ्यांचा चषक उंचावला. एटीकेचा हा तिसरा चषक आहे. २०१४ मध्ये त्यांना चेन्नईयन संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवाचा वचपा त्यांनी शनिवारी काढला. दुसरीकडे, एटीकेचा कर्णधार तथा स्ट्रायकर कृष्णा यानेही प्रेक्षकांविना सामना खेळविण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. तो म्हणाला, प्रेक्षकांपुढे खेळणे हे नेहमीच आनंददायी असते. मात्र, लोकांचे आरोग्य लक्षात घेता, या निर्णयाचा आदर व्हायला हवा.