रोनाल्डोने नोंदवला विक्रमी ७०० वा गोल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 04:40 AM2019-10-16T04:40:16+5:302019-10-16T04:40:56+5:30
युरो पात्रता : युक्रेनने स्पर्धा प्रवेश मिळवत दिला पोर्तुगालला धक्का
पॅरिस : युक्रेनने पोर्तुगालचा पराभव करीत युरो २०२० साठी पात्रता मिळविली. या लढतीत पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या कारकिर्दीतील ७०० वा गोल नोंदवला.
सोफियामध्ये दुसऱ्या लढतीत इंग्लंडने बुल्गारियाचा पराभव केला. पण यजमान चाहत्यांनी इंग्लंडच्या खेळाडूंवर वर्णद्वेषी शेरेबाजी केली. युक्रेनपूर्वी पोलंड, रशिया, इटली आणि बेल्जियम या संघांनीही १२ जूनपासून प्रारंभ होत असलेल्या युरो कप फुटबॉल स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे.
‘अ’ गटातील अव्वल संघ इंग्लंडला सध्या प्रतीक्षा करावी लागणार आहे. बल्गेरियाला ६-० ने पराभूत केल्यानंतरही त्यांना पात्रता मिळविता आलेली नाही. या लढतीत स्थानिक चाहत्यांनी दोनदा वर्णद्वेषी नारेबाजी केली. त्यामुळे सामना थांबवावा लागला. इंग्लंड फुटबॉल संघटनेने फिफाला या प्रकरणात चौकशी करण्याची सूचना केली आहे.
दरम्यान, फ्रान्स व तुर्की यांच्यादरम्यान सुरू असलेल्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर खेळल्या गेलेली लढत अनिर्णीत संपली. फ्रान्सने सिरियामध्ये सैनिक कारवाईसाठी तुर्कीवर टीका केली आहे. फ्रान्सला पुढील महिन्यात मोलदोवाचा पराभव करीत पात्रता मिळविण्याची संधी आहे. दुसºया बाजूचा विचार करता, तुर्कीने आईसलँड विरुद्धची लढत बरोबरीत सोडविली तरी त्यांना पात्रता मिळविता येईल. (वृत्तसंस्था)
रोनाल्डो गोल
करण्यात ‘उजवा’च!
रोनाल्डोने आपल्या कारकिर्दीतील एकूण गोलपैकी ४४४ म्हणजेच ६३% गोल उजव्या पायाने केले आहेत. तसेच १२६ गोल डाव्या पायाने, १२८ गोल हेडरद्वारे नोंदवले आहेत. याशिवाय त्याने दोन गोल छातीच्या सहाय्यानेही केले आहेत.
रेयाल माद्रिदसाठी
सर्वाधिक गोल
आपल्या १७ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोर्तुगालकडून खेळताना ९५ गोल केले आहेत. याशिवाय विविध आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्लब संघाकडून खेळताना त्याने ६०५ गोल केले आहेत. यामध्ये रोनाल्डोने रेयाल माद्रिद क्लबसाठी सर्वाधिक ४५० गोल नोंदवले असून मँचेस्टर युनायटेडसाठी ११८, युवेंट्ससाठी ३२ आणि स्पोर्टिंग क्लब पोर्तुगालसाठी ५ गोल केले आहेत.
७०० गोल करणारे फुटबॉलपटू
१. जोसेफ बायकन 805
(झेक प्रजासत्ताक)
२. रोमारियो (ब्राझील) 772
३. पेले (ब्राझील) 767
४. फेरेंक पुस्कास (हंगेरी) 746
५. गर्ड म्यूलर (जर्मनी) 735
६. ख्रिस्तियानो रोनाल्डो700 (पोर्तुगाल)