मॉस्को: चौथ्या विश्वचषकात खेळत असलेला दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो याच्या खेळाची तुलना पोर्तुगाल संघाचे प्रशिक्षक फर्नांडो सॅन्टोज यांनी‘ ओल्ड वाईनशी’ केली. खेळाडू जसा अनुभवी होतो, तसा बहरत जातो, असे ते म्हणाले.ब गटाच्या सामन्यात काल रोनाल्डोने मोरोक्कोविरुद्ध चौथ्या मिनिटाला गोल नोंदवित संघाला १-० ने विजय मिळवून दिला. त्याआधी पहिल्या सामन्यात २०१० चा चॅम्पियन स्पेनविरुद्ध हॅट्ट्रिक नोंदविली. विश्वचषकात संघाचे चारही गोल रोनाल्डोनेच केले आहेत.मागील तीन विश्वचषकात रोनाल्डो केवळ तीन गोल करण्यात यशस्वी ठरला. मात्र यंदा दोन सामन्यात तब्बल चार गोल नोंदविले. सॅन्टोज म्हणाले,‘ख्रिस्टियानो ‘ओल्ड वाईन’सारखा आहे. वाढत्या वयानुसार त्याचा खेळ बहरतच आहे. अन्य खेळाडूंच्या तुलनेत त्याच्या खेळात कमालीची सुधारणा झालेली दिसते. पुढील दोन-तीन वर्षानंतर मात्र त्याच्याकडून अशी कामगिरी शक्य होणार नाही. मागील चार-पाच वर्षांत त्याचा खेळ जसा पहायला मिळायचा त्यात मोठी सुधारणा झालेली दिसते. तो स्वत:ला चांगला ओळखून आहे. कुठल्या क्षणी काय करायला हवे, याचे तंत्र त्याला अवगत आहे. ’रोनाल्डोने पात्रता सामन्यात १५ गोल केले. या बळावर पोर्तुगालने सलग नऊ सामने जिंकून पाचव्यांदा मुख्य स्पर्धेची पात्रता गाठली. संघातील रोनाल्डोचा सहकारी बर्नांडो सिल्व्हा म्हणाला,‘ रोनाल्डोचे कौतुक करायला शब्द कमी पडतात. तो अप्रतिम खेळाडू आहे. फुटबॉल इतिहासातील तो सर्वांत महान नसेलही पण महान खेळाडूंपैकी एक नक्कीच आहे.’ (वृत्तसंस्था)
रोनाल्डोचा खेळ बहरत आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 4:03 AM