तुरीन (इटली) : दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या हॅटट्रिकच्या जोरावर इटलीच्या युवेंट्स फुटबॉल क्लबने चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मंगळवारी झालेल्या सामन्यात युवेंट्सने एटलेटिको माद्रिदला ३-० अशा गोलफरकाने पराभूत केले.युवेंट्सने या विजयासह पहिल्या फेरीत एटलेटिकोकडून झालेल्या पराभवाचाही बदला घेतला. याआधी झालेल्या पहिल्या सत्रातील सामन्यात एटलेटिकोने युवेंट्सला २-० असा धक्का दिला होता. सामन्याच्या २७ व्या मिनिटाला रोनाल्डोने गोल केला. त्यानंतर उत्तरार्धाच्या सुरुवातीलाच ४९ व्या मिनिटाला गोल करत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. सामना संपण्यासाठी थोडा अवधी शिल्लक असताना युवेंट्सला पेनल्टी मिळाली. या पेनल्टीवर गोल करत रोनाल्डोने हॅटट्रिक पूर्ण केली. यासह एटलेटिकोच्या अपेक्षांवर पाणी फेरले.रोनाल्डोची चॅम्पियन्स लीगमधील ही आठवी हॅटट्रिक आहे. या विजयानंतर रोनाल्डोने एटलेटिको माद्रिदचे प्रशिक्षक डिएगो सिमोनकडे पाहून अश्लिल हावभाव केले. सिमोनने पहिल्या फेरीत युवेंट्सला पराभूत केल्यानंतर रोनाल्डोकडे पाहत असेच हावभाव केले होते. हा सामना युवेंट्ससाठी महत्त्वाचा होता. जर हा सामना त्यांनी गमावला असता, तर स्पर्धेतून युवेंट्सचे आव्हान संपुष्टात आले असते.2005-06सालानंतर पहिल्यांदाच युवेंट्सने पहिल्या सत्रातील सामना गमावल्यानंतर विजयी कामगिरी करण्याची किमया केली. रोनाल्डोने सामन्यातील तिन्ही गोल करताना चॅम्पियन्स लीगमध्ये सर्वाधिक १२४ गोल्सची नोंद केली.
रोनाल्डोची विक्रमी हॅट्ट्रिक; युवेंट्स संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 3:54 AM