दिएगो मॅराडोना यांच्या निधनानं फुटबॉल वर्तुळात शोकाकुळ वातावरण असताना आणखी एका स्टार खेळाडूनं जगाचा निरोप घेतला. सेनेगल फुटबॉल संघाचा मिडफइल्डर पापा बौबा डिओप याचं ४२व्या वर्षी निधन झालं. २००२च्या वर्ल्ड कप स्पर्धेत डिओपच्या गोलनं वर्ल्ड कप विजेत्या फ्रान्सला पराभवाचा धक्का दिला होता.
डिओपनं २००१ ते २००८ या कालावधीत ६५ सामने खेळले. सेनेगलला २००२च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्यूपूर्व फेरीत प्रवेश करून देण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता. आतापर्यंत तीन आफ्रिकन देशांनी वर्ल्ड कपच्या अंतिम ८ संघांमध्ये प्रवेश केला आहे. त्यापैकी एक सेनेगल आहे.
डिओपनं २००२च्या वर्ल्ड कप स्पर्धेत विजेत्या फ्रान्सविरुद्ध विजयी गोल केला होता. त्यानंतर उरुग्वेला ३-३ असे बरोबरीत रोखून आणखी एक धक्कादायक निकाल नोंदवला. उपांत्यपूर्व फेरीत त्यांना टर्कीकडून पराभव पत्करावा लागला. डिओपनं चार वेळा आफ्रिका चषक राष्ट्रीय स्पर्धेत सेनेगलचे प्रतिनिधित्व केलं आणि २००२मध्ये त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला होता.