याच त्रिकुटाने आणले मेस्सीच्या डोळ्यात पाणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 02:01 PM2018-06-22T14:01:18+5:302018-06-22T14:01:18+5:30
सामन्यातील पराभवामुळे ‘ज्या’ त्रिकुटाने मेस्सीच्या डोळ्यातही पाणी आणले ते तीन स्टार मात्र चमकले.
- सचिन कोरडे
मॉस्को - क्रोएशिया-अर्जेटिना या सामन्याच्या निकालाने यंदाच्या विश्वचषकात मोठा उलटफेर केला. या निकालाने मेस्सीच्या चाहत्यांना जबर धक्का दिला. ‘ये क्या हुआ’ ...असेच म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली. कारण चॅम्पियन बननण्याचा दावेदार असलेल्या या संघाचे विश्वचषकातील स्थान संकटात आहे. सामन्यातील पराभवामुळे ‘ज्या’ त्रिकुटाने मेस्सीच्या डोळ्यातही पाणी आणले ते तीन स्टार मात्र चमकले.
सोशल मिडियावर हे त्रिकूट खूप गाजत आहे. क्रोएशियाच्या इवान रॅकितिक, कर्णधार लुका मॉड्रीक आणि सिम वर्झाझिको ही त्यांची नावे. या तिघांनी अर्जेटिनाच्या खेळाडूंना जेरीस आणले आणि आता मेस्सीचा संघ परतीच्या वाटेवर आहे. या तिघांच्या शानदार प्रदर्शनामुळेच मेस्सीच्या चाहत्यांना ‘शॉक’ बसला.
- लुका मॉड्रीक
प्रत्येक आक्रमणाचा हार्ट असलेला हा खेळाडू. एक कर्णधार म्हणून संघाला उत्तमपणे सांभाळत संपूर्ण सामन्यावर याच्याकडे नजरा होत्या. कारण अत्यंत चपळ, वेगवान आणि संधीसाधू म्हणून त्याची ओळख. त्याने त्याचा टॉप क्लास दाखवला. एक गोलने आघाडी घेतल्यानंतर याने क्रोएशियाची आघाडी दुप्पट केली आणि अर्जेटिनाच्या चाहत्यांना स्तब्ध केले. मैदानात शांतता पसरली. तो मात्र आनंदात सुसाट सुटला होता. यंदाच्या विश्वचषकातील ५० वा गोल याच खेळाडूने पूर्ण केला. सलग दुसरा गोलही त्याने नोंदवला. रिअल माद्रीदचा हा खेळाडू क्रोएशियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
- इवान रॅकितिक
क्रोएशियाच्या विजयोत्सवातील हा सुद्धा एक महत्वपूर्ण साथीदार. मध्यरक्षक म्हणून त्याने जी जबाबदारी सांभाळली ती वाखाणण्याजोगीच. ३० वर्षीय बार्साेलोनाच्या या मिडफिल्डवर सोशल मिडिया भारावला आहे. ९० व्या मिनिटाला त्याने गोल नोंदवून अर्जेटिनाच्या चाहत्यांची झोप उडवली. क्रोएशियासाठी हा त्याचा तिसरा गोल आहे. एक धोकादायक खेळाडू म्हणून इतर प्रतिस्पर्धीही त्याच्याकडे पाहतील.
- सिम वर्झाझिको
क्रोएशियाच्या खेळात सर्वात भक्मक बाजू होती ती त्याचा बचाव. मेस्सीसारख्या तगड्या खेळाडूला जखडून ठेवण्याची किमया क्रोएशियाच्या बचावटूंनी केली. त्यात सिम हा आघाडीवर होता. एका भिंतीप्रमाणे खंबीरपणे उभे राहत त्याने मेस्सीचे फटके परतून लावले. अर्जेटिनाचे स्ट्रायकरही याच्यापुढे हतबल झाले होते. सुक्ष्म नजर ठेवत, वाºयाच्या वेगात धावत येत त्याने चेंडूला परतावून लावले आणि अर्जेटिनाच्या संधी फोल ठरवल्या. त्यामुळ जर्सी नंबर-२ चा हा खेळाडू क्रोएशियाच्या विजयात चमकला.