- रोहित नाईकरविवारी रात्री फिफा विश्वचषक २०१८चा विजेता निश्चित होईल. यासह रात्रभर जल्लोष होईल आणि भारतात महिनाभर सुरू असलेला फुटबॉल ज्वर एकाएकी ओसरेल. भारतात इतर खेळांना महत्त्व नाही किंवा त्यांची क्रेझ नाही, असे अजिबात नाही. आज देशामध्ये इतर खेळांनी मोठी प्रगती केली असली, तरी भारतीयांनी अद्याप म्हणावे तसे इतर खेळांकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळेच भारतात आॅलिम्पिक, राष्ट्रकुल अशा महत्त्वाच्या स्पर्धांपुरतेच क्रीडा वातावरण पाहावयास मिळते.गेल्याच वर्षी भारतात १७ वर्षांखालील फिफा विश्वचषकाचे आयोजन यशस्वीरीत्या पार पडले. यानिमित्ताने का होईला, प्रथमच संपूर्ण देश फुटबॉलमय झाला होता. देशात फुटबॉल क्रांती घडणार अशी प्रत्येकाला खात्री वाटत होती. मात्र, स्पर्धा झाल्यानंतर काही दिवसांनीच महाराष्ट्रात फुटबॉल वाटपामध्ये मोठा घोटाळा झाल्याचे वृत्त आले आणि फुटबॉल क्रांतीचे स्वप्न पाहणाऱ्या क्रीडाप्रेमींना मोठी ‘किक’ बसली.देशात फुटबॉलची क्रेझ वाढत आहे हे मात्र नक्की. तरीही भारतीय फुटबॉलने जागतिक स्तरावर दखल घेण्यासारखी कामगिरी केल्याचे जाणवत नाही. आज अनेक खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीयांची कामगिरी उंचावत आहे. भारताच्या फुटबॉल संघानेही जागतिक क्रमवारीतील स्थान सुधारले आहे. त्यामुळेच भारतीय फुटबॉलही नवी उंची गाठेल असा विश्वास आहे.>गल्ली खेळ महत्त्वाचा...गल्लीत खेळूनच खेळाडूचा पाया भक्कम होतो आणि हे अनेक क्रिकेटपटूंच्या यशाचे रहस्यही ठरले आहे. नेमका असाच प्रकार फुटबॉलमध्येही पाहण्यास मिळतो.पेले, रोनाल्डिन्हो, रोनाल्डो असे अनेक स्टार गल्ली-बोळांत खेळूनच पुढे आले. कारण, येथील कौशल्य मोठमोठ्या अकादमीमध्येही मिळत नाही. प्रगत देशांमध्ये सामाजिक मर्यादांमुळे अनेकदा अशा प्रकारे रस्त्यांवर खेळण्यावर बंधने येतात. युरोपातील काही देशांत अशा विशेष सोयी निर्माण झाल्या आहेत. यामुळेच भारतात गल्ली क्रिकेटप्रमाणेच गल्ली फुटबॉलही खेळण्यास सुरुवात झाली पाहिजे.>प्रोत्साहन गरजेचे...२०१४ साली जागतिक क्रमवारीत १७०व्या स्थानी असलेला भारतीय संघ आज ९७व्या स्थानी आहे. गेल्या वर्षी१७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषविले. परंतु सरकारने काही दिवसांपूर्वी याच फुटबॉलला पुढे जाण्यापासून रोखले. अन्यथा आगामी आशियाई स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाचा समावेश दिसला असता.‘गेल्या वेळी फुटबॉल संघ अव्वल आठमध्ये आला नव्हता, त्यामुळे यंदा ज्या खेळाच्या संघाकडून पदकाची शक्यता जास्त आहे, त्यांनाच संधी मिळेल,’ असे सांगत भारतीय फुटबॉल संघाला आशियाई स्पर्धेत सहभागी होऊ दिले नाही. एकीकडे जग फुटबॉलमय झालेले असताना, भारतात मात्र फुटबॉललाच ‘किक’ बसत होती. विशेष म्हणजे भारतीय फुटबॉल वगळता इतर क्षेत्रातून याचा साधा विरोधही झाला नाही.काही आठवड्यांपूर्वी कर्णधार सुनील छेत्रीने ‘भले शिव्या द्या, पण आम्हाला पाठिंबा द्या,’ अशी विनवणी केली. तेव्हा भारतात फुटबॉलची लाट आली होती. ही लाट या वेळी दिसली नाही. याच उदासीनतेचा भारताला फटका बसतोय.