एलसीबीत कर्मचारीच झाले शिरजोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 06:00 AM2019-09-25T06:00:00+5:302019-09-25T06:00:34+5:30
एक महिला कॉन्स्टेबलही या कामात साथ देत आहे. या वसुलीसाठी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर केला जात असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. यामुळे नव्याने रुजू झालेल्या एलसीबीच्या अधिकाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या अनेक दिवसांपासून अधिकाऱ्यांच्या नेतृत्वापासून वंचित राहिलेल्या स्थानिक गुन्हे शाखेत आता पोलीस निरीक्षक म्हणून उल्हास भुसारी हे अधिकारी रुजू झाले आहेत. मात्र अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांची शिरजोरी कायम आहे. विशिष्ट दारू आणि सट्टा व्यावसायिकांकडून ते नवीन अधिकाऱ्यांच्या नावे वसुली करीत असल्याचा प्रकार पुढे आल्यामुळे एलसीबीचे नेतृत्व या कर्मचाऱ्यांकडे आहे की अधिकाऱ्यांकडे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हा मुख्यालयासह आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, चामोर्शी, आष्टी या भागात दारूची आवक जास्त होते. काही व्यावसायिकांशी जुळलेल्या हितसंबंधामुळे स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक उपनिरीक्षक दर्जाचा कर्मचारी दारू-सट्टा व्यावसायिकांकडून वसुली करीत आहे. एक महिला कॉन्स्टेबलही या कामात साथ देत आहे. या वसुलीसाठी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर केला जात असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. यामुळे नव्याने रुजू झालेल्या एलसीबीच्या अधिकाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हाभरात दारूची आवक वाढत आहे. त्यामुळे या व्यवसायात अडकलेल्या लोकांना अधिकाऱ्यांच्या नावे परस्पर धमकावत कमी वेळात जास्त वसुली करण्याकडे काही कर्मचाºयांचा कल वाढला आहे.
जुन्या कर्मचाऱ्यांचे हितसंबंध
अनेक दिवस स्थानिक गुन्हे शाखेचे नेतृत्व करण्यासाठी पोलीस निरिक्षक दर्जाचे अधिकारी नव्हते. त्याचा गैरफायदा घेत काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे अवैध व्यावसायिकांशी हितसंबंध जुळले. आता अधिकारी रुजू झाल्यानंतरही त्यांची ती चटक गेलेली नाही. त्यामुळे या शाखेत दोन वर्षांपासून कार्यरत कर्मचाऱ्यांना तातडीने दूर करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याशिवाय त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या काही नवीन कर्मचाऱ्यांवरही अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, अशी अपेक्षा केली जात आहे.