१ हजार १०१ प्रकरणे निकाली
By Admin | Published: May 1, 2017 02:12 AM2017-05-01T02:12:04+5:302017-05-01T02:12:04+5:30
जिल्हाभरातील महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एप्रिल ते ३१ मार्च २०१७ अखेरपर्यंत वर्षभराच्या
वर्षभरात ९३ लाखांचा दंड वसूल : गौण खनिज खनन
गडचिरोली : जिल्हाभरातील महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एप्रिल ते ३१ मार्च २०१७ अखेरपर्यंत वर्षभराच्या कालावधीत गौण खनिजाच्या अवैध खनन व वाहतुकीबाबत धाडसत्र राबवून संबंधित गौण खनिज तस्करांकडून एकूण ९३ लाख ५८ हजार ८७६ रूपयांचा दंड वसूल केला. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्षभरात गौण खनिजाच्या अवैध खनन व वाहतुकीबाबत एकूण १ हजार १०१ प्रकरणे निकाली काढली.
जिल्ह्यातील रेतीघाटावरून शासनाच्या नियमानुसार रेती व इतर गौण खनिजाचे खनन व वाहतूक होणे आवश्यक आहे. याबाबत महसूल विभाग व जिल्हा खनिकर्म विभाग नियंत्रण ठेवत असते. गडचिरोली जिल्ह्यातील रेतीघाटाची आॅनलाईन लिलाव प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालय अधिनस्त असलेल्या जिल्हा खनिकर्म विभागाच्या वतीने दरवर्षी राबविल्या जाते. घाटाची विक्री झाल्यानंतर संबंधित कंत्राटदारांना त्या घाटातून रेतीचे खनन व वाहतूक करण्याचा परवाना दिला जातो. मात्र शासनाचे नियम असतानासुद्धा जिल्ह्यातील काही कंत्राटदार क्षमतेपेक्षा अधिक व जास्तीच्या क्षेत्रात रेतीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन करतात. काही कंत्राटदार टीपीपेक्षा अधिक रेती व इतर गौण खनिजाचे खनन व वाहतूक करतात. या अवैध खनन व वाहतुकीला पायबंद घालण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक गठित करण्यात आले आहे.
महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गडचिरोली उपविभागात गेल्या वर्षभरात १७२ प्रकरणे निकाली काढून या प्रकरणातून संबंधित कंत्राटदाराकडून १९ लाख १४ हजार ६४० रूपयांचा दंड वसूल केला. या उपविभागात गडचिरोली व धानोरा तालुक्याचा समावेश आहे.
चामोर्शी व मुलचेरा तालुक्याचा समावेश असलेल्या चामोर्शी उपविभागात महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सन २०१६-१७ या वर्षभरात धाडसत्र राबवून एकूण १७८ प्रकरणे निकाली काढली. या प्रकरणातून संबंधित कंत्राटदाराकडून १३ लाख ९२ हजार ५० रूपयांचा दंड वसूल केला.
देसाईगंज व आरमोरी तालुक्याचा समावेश असलेल्या कुरखेडा उपविभागातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वर्षभरात ४७० प्रकरणे निकाली काढून एकूण १७ लाख ३८ हजार ७२० रूपयांचा दंड वसूल केला.
कुरखेडा व कोरची तालुक्याचा समावेश असलेल्या कुरखेडा उपविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवैध खनन व वाहतुकीबाबतचे १०९ प्रकरणे निकाली काढून एकूण ७ लाख ३ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल केला.
अहेरी व सिरोंचा तालुक्याचा समावेश असलेल्या अहेरी उपविभागात अवैध खनन व वाहतुकीबाबत एकूण १३४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून ३३ लाख ३४ हजार ५६६ रूपयांचा दंड संबंधित कंत्राटदाराकडून वसूल करण्यात आला.
एटापल्ली व भामरागड तालुक्याचा समावेश असलेल्या एटापल्ली उपविभागाच्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वर्षभरात धाडसत्र राबवून गौण खनिजाचे अवैध खनन व वाहतुकीबाबत एकूण ३८ प्रकरणे निकाली काढली व संबंधित कंत्राटदाराकडून २ लाख ७५ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल केला. याबाबतचे सर्वाधिक प्रकरणे देसाईगंज उपविभागाने निकाली काढले असून याची संख्या ४७० आहे. कारवाई सातत्याने सुरू आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
कारवाईत अहेरी उपविभाग अव्वल
गडचिरोली जिल्ह्याच्या बहुतांश भागात रेती व इतर गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक करण्याचा प्रकार प्रचंड वाढला आहे. रेती व इतर गौण खनिजाची तस्करी करून मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ पदरात पाडून घेण्यासाठी अनेक कंत्राटदार व तस्कर प्रयत्न करतात. गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात धाडसत्र राबवून सर्वाधिक दंड वसूल करण्याच्या कामात अहेरी उपविभाग आघाडीवर आहे. अहेरी तालुक्यातील महसूल विभागाने ३६ प्रकरणे निकाली काढून ३ लाख ८८ हजार ८०० तर सिरोंचा तालुक्यातील महसूल विभागाने ९८ प्रकरणे निकाली काढून २९ लाख ४५ हजार ७६६ रूपयांचा दंड वसूल केला. अहेरी उपविभागाने सर्वाधिक ३३ लाख ३४ हजार ५६६ रूपयांचा दंड वसूल केला. अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीच्या कारवाईत इतर उपविभाग माघारले आहे.