तालुक्यात एकमेव धरण असलेल्या कन्नमवार जलाशयाने ऑगस्ट २०२० मध्ये पाण्याची २३०.५७ मीटर पातळी गाठली होती. हे धरण १०० टक्के भरून ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. त्यामुळेच अंदाजे २८ हजार ८०० हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी खरीप हंगामात ११ हजार हेक्टर शेतजमिनीला सिंचन सुविधांची सोय झाली. उर्वरित शेतीला मामा व इतर गावतलाव, विहिरी, बोड्या आदींच्या साहाय्याने सिंचन झाले. त्यानंतर जलाशयात ५४ टक्के जलसाठा शिल्लक होता.
रबी धान पिकासाठी जलाशयात शिल्लक असलेल्या उपयुक्त पाणीसाठ्यातून घोट शाखेअंतर्गत येत असलेल्या जंगमपूर मायनरमधील १५० हेक्टर शेतजमिनीला पाणी दिले. त्यानंतर ७ मे रोजी ११.४७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
(बॉक्स)
१६९ गावतलावांत १५ टक्के पाणीसाठा
- कुनघाडा लघु तलावात २५.४६ टक्के, अनखोडा लघु तलावात १६.१५, तळोधी मामा तलावात ७.५२, घोट मामा तलावात ३६.३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. चिचडोह बॅरेजचे दरवाजे बंद केल्याने तिथेही पाणीसाठा उपलब्ध असून, जिल्हा परिषद सिंचन उपविभागांतर्गत येत असलेल्या तालुक्यातील १६९ गावतलावांत सरासरी १५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
- तालुक्यातील सर्वच तलावांत काही प्रमाणात जलसाठा उपलब्ध असल्याने जनावरांच्या पाण्याची समस्या सुटणार आहे. येत्या जून महिन्यापर्यंत पाणी समस्येपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या पाणी संकटातून तालुकावासीयांची सुटका झाली आहे.