तीन दिवसांपासून : महावितरणचे दुर्लक्ष जिमलगट्टा : अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा विद्युत उपकेंद्रांतर्गत उमानूर फिडरच्या परिसरातील १३ गावे गेल्या तीन दिवसांपासून अंधारात आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिक ऐन उन्हाळ्यात उकाड्याने प्रचंड त्रस्त झाले आहेत. उमानूर फिडरवर नेहमी विजेचा लपंडाव सुरू असतो. गेल्या दोन महिन्यांपासून मुलेवाही, मरपेल्ली परिसरात आठवड्यातून केवळ दोन दिवस कसाबसा विद्युत पुरवठा सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील तीन दिवसांपासून उमानूर परिसरातील १३ गावांमध्ये वीज पुरवठा खंडीत असल्याने ही गावे अंधारात आहे. वीज पुरवठ्याअभावी या परिसरातील टीव्ही, फ्रिज, कुलर, पंखे यासारखी वीज उपकरणे शोभेच्या वस्तू बणल्या आहेत. महावितरणचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे जनतेला उन्हाळ्यात प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. उमानूर, गोंविदगाव, येंकाबंडा, मरपल्ली, बेजुरपल्ली, मुलेवाही, सिलमपल्ली, जोगनगुड्डा, बस्वापूर, रेगुलवाही, डुबगुडम आदी गावे तीन दिवसांपासून अंधारात आहेत. या संदर्भात विचारणा केली असता, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शिकारीचे प्रमाण वाढले असल्याचे सांगण्यात येत आहे. महावितरणने तत्काळ उमानूर भागातील वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वीज पुरवठ्याअभावी ग्रामीण भागातील अनेक कामांवर परिणाम होत आहे. (वार्ताहर)
उमानूर परिसरातील १३ गावे अंधारात
By admin | Published: May 01, 2017 2:10 AM