१४ ग्रामपंचायतींचा होणार सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 01:07 AM2018-10-27T01:07:52+5:302018-10-27T01:08:21+5:30
जिल्हा व जिल्हा परिषद प्रशासनाच्या पुढाकाराने ग्रामपातळीवर वनराई बंधारा बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायती कमीत कमी १० बंधाऱ्यांचे काम उत्कृष्टरित्या करून जलसंधारणाचे काम करतील, अशा जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींना रोख पुरस्कार देऊन प्रशासनाच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे.
दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा व जिल्हा परिषद प्रशासनाच्या पुढाकाराने ग्रामपातळीवर वनराई बंधारा बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायती कमीत कमी १० बंधाऱ्यांचे काम उत्कृष्टरित्या करून जलसंधारणाचे काम करतील, अशा जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींना रोख पुरस्कार देऊन प्रशासनाच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे.
प्रशासन व नरेगा विभागाच्या पुढाकाराने जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात २५ सप्टेंबर ते ७ आॅक्टोबर या कालावधीत वनराई बंधारा निर्मितीची चळवळ उभारण्यात आली. जिल्हाधिकारी शेखर सिंह, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर यांच्यासह जि.प.च्या इतर पदाधिकाºयांच्या संकल्पनेतून यंदा प्रथमच जिल्ह्यात वनराई बंधारा निर्मितीची चळवळ उभारण्यात आली. जमिनीतील पाणी जमिनीत मुरावे, पाणीपातळी वाढावी, सिंचन क्षेत्र वाढावे तसेच टंचाईमुक्त गडचिरोली जिल्हा व्हावा, या उदात्त हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला. सिमेंटची रिकामी बॅग, माती, वाळू व दगड यांच्या सहाय्याने जिल्हाभरात मागील आठवड्यापर्यंत जवळपास दोन हजार वनराई बंधारे बांधण्यात आले. जिल्हाभरात तब्बल २ हजार ७९३ बंधारे बांधकामाचे उद्दिष्ट प्रशासनाने दिले आहे. त्यानुसार आरमोरी तालुक्यात सर्वाधिक ४००, त्याखालोखाल धानोरा तालुक्यात ३१०, देसाईगंज ३०० वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. याशिवाय इतरही तालुक्यांना १००, १५० ते २०० बंधारे बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वनराई बंधाऱ्याचे बांधकाम श्रमदान करून लोकसहभागातून केले जात आहे. याचा आढावाही तालुका व जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने घेतला जात आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार आतापर्यंत चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक २८०, कोरची तालुक्यात २०६, धानोरा तालुक्यात २०२, सिरोंचा तालुक्यात २०१, आरमोरी तालुक्यात १९२ बंधाऱ्याचे काम झाले आहे. याशिवाय देसाईगंज तालुक्यात १८५, गडचिरोली १८५, एटापल्ली ९५, मुलचेरा ९०, कुरखेडा ७०, अहेरी तालुक्यात ५२ बंधाऱ्याचे काम झाले आहे. सिरोंचा व भामरागड तालुका या कामात माघारला आहे.
असे मिळणार रोख पुरस्कार
ज्या ग्रामपंचायती कमीत कमी १० वनराई बंधारे तयार करणार, अशा ग्रामपंचायती तालुकास्तरीय पुरस्कार स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. यापैकी प्रत्येक तालुक्यातून एका ग्रामपंचायतीची निवड करण्यात येणार आहे. प्रती ग्रामपंचायतीला २० हजार रूपयांचा तालुकास्तरीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
तालुकास्तरावरील स्पर्धेसाठी पात्र झालेल्या ग्रामपंचायतीमधून जिल्हास्तरावर दोन ग्रामपंचायतीची निवड करण्यात येणार आहे. एका ग्रा.पं.ला प्रथम व दुसऱ्या ग्रा.पं.ला द्वितीय पुरस्कार दिला जाणार आहे. प्रथम पुरस्कार रोख ६० हजार रूपये व द्वितीय पुरस्कार ४० हजार रूपयांचा असणार आहे.
तालुकास्तरावरून तपासणीस प्रारंभ
कोणत्या ग्रामपंचायतीने किती व कशाप्रकारचे वनराई बंधारे बांधले याबाबतची प्रत्यक्ष तपासणी तालुकास्तरीय देखरेख, अंमलबजावणी व तपासणी समितीमार्फत २० आॅक्टोबरपासून सुरू झाली आहे. या समितीमध्ये संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी, शाखा/कनिष्ठ अभियंता आदींचा समावेश आहे.
तालुकास्तरावरील तपासणी व मूल्यमापनाचे काम पूर्ण झाल्यावर जिल्हास्तरीय समितीकडून बंधारा कामाची तपासणी करण्यात येणार आहे. या जिल्हास्तरीय समितीमध्ये जि.प.चे उपमुख्य कार्यकारी (ग्रा.पं.), उपमुख्य कार्यकारी (नरेगा), कृषी विकास अधिकारी (जि.प) व पंचायत विस्तार अधिकारी (जिल्हा परिषद) आदींचा समावेश आहे.