२०१ शाळांचा दर्जा उत्कृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:38 AM2017-11-22T00:38:09+5:302017-11-22T00:38:20+5:30
शाळासिद्धी उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील एकूण २ हजार ८४ शाळांपैकी २०१ शाळांना ‘अ’ श्रेणीचे नामांकन प्राप्त झाले आहे.
दिगांबर जवादे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शाळासिद्धी उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील एकूण २ हजार ८४ शाळांपैकी २०१ शाळांना ‘अ’ श्रेणीचे नामांकन प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शाळेतील सोयीसुविधा आदी बाबी शाळा सिध्दी उपक्रमांतर्गत तपासून ‘अ’ श्रेणी देण्यात आली असल्याने संबंधित शाळांचा दर्जा उत्कृष्ट असल्याचे स्पष्ट होत आहे.
शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांची माहिती कळावी. त्याचबरोबर आयएसओ मानांकनाप्रमाणे त्यांना श्रेणी देता यावी, यासाठी केंद्र शासनाने उपक्रम सुरू केला असून राज्यात सदर कार्यक्रम शाळा सिध्दी उपक्रम म्हणून ओळखल्या जातो.
मागील शैक्षणिक सत्रात शाळा सिध्दी उपक्रमांतर्गत मुख्याध्यापकांना त्यांच्या शाळेमध्ये असलेल्या सोयीसुविधा व विद्यार्थ्यांची गुणवत्ता याबाबतची माहिती शाळा सिध्दीच्या वेबसाईटवर भरण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार मुख्याध्यापकांनी स्वयंमूल्यांकन करून वेबसाईटवर माहिती भरली होती. शाळा सिध्दीची माहिती भरणे सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सक्तीचे करण्यात आले होते. गडचिरोली जिल्ह्यात एकूण २ हजार ८४ शाळा आहेत. त्यापैकी १ हजार ७१६ शाळांनी पूर्णपणे माहिती भरली. २७३ शाळांनी अपुरी माहिती सादर केली आहे. तर ९५ शाळांनी नोंदणीच केली नाही. पूर्णपणे माहिती भरलेल्या शाळांपैकी सुमारे २०१ शाळांना अ दर्जा प्राप्त झाला आहे. ९९९ गुणांपैकी ८९९ ते ९९९ गुण प्राप्त करणाºया शाळांना ‘अ’ श्रेणी दिली जाते. जिल्ह्यातील जवळपास १५०० शाळा अजुनही ‘ब’ श्रेणीतच आहेत. या शाळांना ‘अ’ श्रेणीत आणणे हे शिक्षण विभागासमोरील सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे.
बाह्य समितीमार्फत होणार मूल्यांकन
शाळांनी ‘अ’ दर्जा प्राप्त केला आहे, अशा शाळांचे बाह्य समितीच्या मार्फत मूल्यांकन केले जाणार आहे. मागील शैक्षणिक वर्षात एप्रिल महिन्यात बाह्य मूल्यांकनाची प्रक्रिया शिक्षण विभागाने सुरू केली होती. गडचिरोली जिल्ह्यातील दोन शाळांचे बाह्य मूल्यांकन करण्यात आले. मात्र अचानक बाह्य मूल्यांकनाला स्थगिती देण्यात आली. मुख्याध्यापकांनी भरलेल्या माहितीवरून शाळांना ‘अ’ श्रेणी प्रदान करण्यात आली आहे. या शाळांची खरी कस बाह्य समितीच्या मार्फत मूल्यांकन होईल.
या मानकांवर ठरली शाळेची श्रेणी
क्षेत्र क्रमांक १ मध्ये शाळेचे सामर्थ्यस्त्रोत याचा समावेश होतो. त्यामध्ये शालेय परिसर, क्रिडांगण, वर्गखोल्या, विद्युत, विद्युत उपकरणे, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक, पेयजल, भोजन स्वयंपाकगृह, हात धुण्याची सुविधा, स्वच्छतागृह यांचा समावेश असून त्यावर एकूण १०८ गुण आहेत.
क्षेत्र क्रमांक २ मधील अध्ययन, अध्यापन मुल्यांकन याचा समावेश आहे. यामध्ये शिक्षकांची विद्यार्थ्यांविषयी जाणीव, शिक्षकांचे विषयज्ञान व अध्यापन कौशल्य, अध्यापनाचे नियोजन, अध्ययनक्षम वातावरण निर्मिती, वर्ग व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचे मूल्यांकन अध्यापन साधनांचा वापर यांचा समावेश होतो.
क्षेत्र क्रमांक ३ मध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती, सहभाग, प्र्रगती, वैयक्तिक व सामाजिक विकास, विद्यार्थी संपादणूक यांचा समावेश आहे.
क्षेत्र क्रमांक ४ मध्ये नवनियुक्त शिक्षकांचे उद्बोधन, शिक्षकांची उपस्थिती, बदल्यांसाठी शिक्षकांची तयारी, व्यावसायिक विकास यांचा समावेश आहे.
क्षेत्र क्रमांक ५ मध्ये दृष्टी व दिशा निश्चिती, अध्ययन अध्यापन नेतृत्व, शालेय व्यवस्थापनाचे नियोजन यांचा समावेश आहे.
क्षेत्र क्रमांक ६ मध्ये समावेशीत संस्कृती, शारीरिक संरक्षण, मानसिक संरक्षण, आरोग्य स्वच्छता या मानकांचा समावेश आहे.
क्षेत्र क्रमांक ७ मध्ये शाळा विकसनाची भूमिका, शाळा समाज सबलीकरण, शाळा समाज संसाधन या मानकांचा समावेश आहे.