गडचिरोली : ३०/५४ जिल्हा वार्षिक योजना, ३०/५४ मार्ग व पूल तसेच १३ व्या वित्त आयोगाच्या योजनेतून जिल्हा परिषदेच्या गडचिरोली बांधकाम उपविभागामार्फत सन २०१४-१५ व सन २०१५-१६ या दोन वर्षात १०० हून अधिक कामे मंजूर करण्यात आली. मात्र यापैकी २१ कामे अपूर्ण असून ५ कामांना सुरुवात झाली नाही. प्रशासकीय उदासीनतेमुळे बांधकाम रखडली आहेत.३०/५४ जिल्हा वार्षिक योजना व शाळा इमारत दुरूस्तीचेही दोन वर्षात एकूण २८ कामे घेण्यात आली. यापैकी ११ कामे पूर्ण झाली असून २३ कामे सुरू आहेत. तर तब्बल १२ कामे अपूर्ण स्थितीत आहेत. चार कामांना सुरुवात झाली नाही. सार्वजनिक आरोग्य योजनेंतर्गत तीन कामांपैकी दोन कामे सुरू असून एक काम अपूर्ण आहे. पशुसंवर्धन विभागाच्या योजनेतून आठ कामे घेण्यात आली. यापैकी सहा पूर्ण झाली असून दोन अपूर्ण आहेत. येवली व मौशीखांब येथील पशुवैद्यकीय दवाखाना परिचर निवासस्थान ही दोन कामे अपूर्ण आहे. ३०/५४ मार्ग व पूल योजनेतून गडचिरोली-विसापूर-इंदाळा-पारडी रस्त्याचे काम घेण्यात आले. मात्र ते अद्यापही सुरू करण्यात आले नाही. १३ व्या वित्त आयोगातून दोन वर्षात रस्ता व डांबरीकरणाची एकूण ३६ कामे घेण्यात आली. यापैकी २९ कामे पूर्ण झाली असून ४ कामे अपूर्णस्थितीत आहेत. गोविंदपूर येथीेल सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम निविदा प्रक्रियेत थांबले आहे. अतिरिक्त केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत कृषी गोदाम बांधण्याची तरतूद आहे. या योजनेतून सन २०१५-१६ वर्षात बोदली येथे कृषी गोदाम बांधण्याचे काम मंजूर करण्यात आले. मात्र सदर काम अद्यापही अपूर्ण आहे. मानव विकास मिशन अंतर्गत सन २०१४-१५ मध्ये खरपुंडी येथील प्रसाविका उपकेंद्र इमारतीचे काम घेण्यात आले. सदर काम अपूर्ण आहे. सन २०१५-१६ मध्ये वाकडी येथे उपकेंद्र इमारतीचे काम मंजूर करण्यात आले. मात्र हे ही काम अद्यापही पूर्ण झाले नाही. खासदार निधी कार्यक्रमांतर्गत दोन वर्षात एकूण सहा कामे घेण्यात आली. यापैकी पाच कामे पूर्ण झाली असून एक काम अंतिम टप्प्यात आहे. इतर तालुक्याच्या दुर्गम भागातही विकास कामात अशीच परिस्थिती आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
गडचिरोली उपविभागात २१ कामे अपूर्ण
By admin | Published: March 10, 2016 2:18 AM