एटीएममधून ३६ हजार लुटले

By admin | Published: March 20, 2017 01:26 AM2017-03-20T01:26:00+5:302017-03-20T01:26:00+5:30

अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्याकडून एटीएम कार्ड घेऊन गेल्या चार महिन्यांपासून थोडेथोडे करीत ३६ हजार रूपये लंपास करणाऱ्या युवकाला चामोर्शी पोलिसांनी अटक केली.

36 thousand robbed from the ATM | एटीएममधून ३६ हजार लुटले

एटीएममधून ३६ हजार लुटले

Next

अल्पवयीन मुलीची फसवणूक : आरोपीला तीन दिवसांचा पीसीआर
चामोर्शी : अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्याकडून एटीएम कार्ड घेऊन गेल्या चार महिन्यांपासून थोडेथोडे करीत ३६ हजार रूपये लंपास करणाऱ्या युवकाला चामोर्शी पोलिसांनी अटक केली. आरोपीविरूध्द कलम ३५४ (अ) (१), ३५४ (ड) (१), बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ११ व १२ नुसार गुन्हा दाखल केला. सुरेश गेडाम रा. चामोर्शी असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे.
अल्पवयीन पीडित मुलीच्या तक्रारीनुसार, चामोर्शी येथील सुरेश गेडाम हा युवक पीडित मुलीच्या मागे सुमारे एक वर्षापासून छेडछाड करण्याचा प्रयत्न करीत होता. मैत्री करण्यासाठी वारंवार बोलण्याचा प्रयत्न करून प्रेमाचा नाटक करीत असे.
नोव्हेंबर २०१६ मध्ये मला नोकरी मिळाली असून पैशाची गरज आहे. तीन महिन्यानंतर पगार सुरू होईल. माझ्याकडे आता पैसे नाही. घरचे लोक पैसे देत नाही. तु काही तरी कर व मला पैसे दे. मी क्रिमीनल मुलगा आहे. आतापर्यंत तीन खुन केले असून पैसे न दिल्यास तुलाही मारून टाकेल, अशी धमकी युवकाने दिली. तेव्हा त्याला नोव्हेंबर २०१६ मध्ये एटीएममधून दोन हजार रूपये काढून दिले. त्यानंतर त्याने धमकी देऊन एटीएम कार्ड घेतले व थोडे थोडे करीत असे एकूण ३६ हजार रूपये लंपास केले. एटीएममधील पैसे संपल्यावर त्याने एटीएम परत केले, असे अल्पवयीन मुलीने तक्रारीत म्हटले आहे.
सदर बाब घरच्या लोकांना कळताच पीडित मुलीने चामोर्शी पोलीस ठाण्यात जाऊन युवकाच्या विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून चामोर्शी पोलिसांनी लागलीच सुरेश गेडाम याला अटक करून विशेष सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास चामोर्शीचे पोलीस निरिक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरिक्षक खोब्रागडे करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 36 thousand robbed from the ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.