जि.प.च्या ४८० शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या हाेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:35 AM2021-04-15T04:35:23+5:302021-04-15T04:35:23+5:30
गडचिराेली : जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षकांच्या ऑनलाइन पद्धतीने ३१ मेपर्यंत बदल्या करण्याबाबतचा शासन निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने ७ एप्रिल ...
गडचिराेली : जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षकांच्या ऑनलाइन पद्धतीने ३१ मेपर्यंत बदल्या करण्याबाबतचा शासन निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने ७ एप्रिल राेजी निर्गमित केला आहे. या शासन निर्णयाला अधीन राहून गडचिराेली जिल्ह्यातील पात्र ४८० पेक्षा अधिक शिक्षकांच्या बदल्या हाेणार आहेत.
शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत यापूर्वीचा म्हणजे २७ फेब्रुवारी २०१७चा शासन निर्णय वादग्रस्त ठरला हाेता. या जीआरप्रति शिक्षक संघटनांकडून ओरडही झाली. त्यामुळे शासन निर्णयात बदल करण्यात यावा, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली हाेती. त्या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये बऱ्याच सुधारणा करून नवीन शासन निर्णय तयार करण्यात आला. गडचिराेली जिल्ह्याच्या अहेरी उपविभागात नेहमी बऱ्याच शाळांमध्ये शिक्षकांच्या पदांबाबत ओरड हाेत असते. या भागातील शाळा दुर्गम भागात असल्याने येथे शिक्षक सेवा द्यायला तयार हाेत नाही.
बाॅक्स...
यांच्या हाेतील बदल्या
नवीन शासन निर्णयातील तरतुदी व मार्गदर्शक सूचनांनुसार सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षांची सेवा व एका शाळेत पाच वर्षांची सेवा पूर्ण करणारे तसेच अवघड क्षेत्रात तीन वर्ष सेवा पूर्ण करणारे शिक्षक बदलीकरिता पात्र ठरणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या जाेडीदारास गंभीर आजार असल्यास अशा कर्मचाऱ्यांना संवर्ग १चा लाभ मिळणार आहे. तर संवर्ग दाेनचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांचा पुढील बदलीच्या वेळी एक एकक म्हणून बदलीसाठी विचार करण्यात येणार आहे. संवर्ग १ व संवर्ग २ अंतर्गत बदली करणाऱ्यांना पुढील तीन वर्षे बदली करता येणार नाही.
बाॅक्स...
पाच टप्प्यात बदली प्रक्रिया
बदलीसाठी अर्ज केल्यानंतर ३० ऑप्शन (पर्याय) घ्यावे लागणार आहेत. संवर्गनिहाय बदल्या हाेणार आहेत. प्रत्येक टप्प्यावर जिल्ह्यातील रिक्त जागा दाखविल्या जातील. एकूणच पाच टप्प्यात ही शिक्षक बदली प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
बाॅक्स.....
खाेटी माहिती दिल्यास शिक्षकांचे निलंबन
खाेटी माहिती सादर करून संवर्ग १ व संवर्ग २ मध्ये बदलीचा लाभ घेतल्यास अशा शिक्षकांना निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही सुरू करावी, अशी स्पष्ट तरतूद ७ एप्रिल राेजीच्या नव्या शासन निर्णयात करण्यात आली आहे.
बाॅक्स...
काेराेनामुळे गतवर्षी प्रक्रिया नाही
सन २०१७ व २०१८ या दाेन्ही वर्षात गडचिराेली जिल्हा परिषदेअंतर्गत पात्र शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. ऑनलाइन प्रक्रिया राबवून बदलीपात्र शिक्षकांना न्याय देण्यात आले. मात्र गतवर्षी काेराेना महामारीच्या संकटामुळे शिक्षकांची बदली प्रक्रिया प्रशासनाला घेता आली नाही. शिक्षण विभागाने ही प्रक्रिया हाती घेण्यासाठी नियाेजन केले हाेते. मात्र काेराेना संसर्ग वाढल्याने ही बदली प्रक्रिया रद्द करावी लागली.