देसाईगंज दीक्षाभूमीसाठी ५४ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 01:27 AM2018-09-19T01:27:22+5:302018-09-19T01:28:39+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या देसाईगंज येथील दीक्षाभूमीचे सुशोभीकरण करण्यासाठी ५४ लाख २० हजार ५९० रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या देसाईगंज येथील दीक्षाभूमीचे सुशोभीकरण करण्यासाठी ५४ लाख २० हजार ५९० रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर निधी सहायक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली व सम्यक जागृत बौध्द महिला समितीचे सचिव यांच्या संयुक्त खात्यात जमा करण्यात आला आहे. त्यामुळे दीक्षाभूमीचे रूप पालटण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत सम्यक जागृत बौध्द महिला महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
२९ एप्रिल १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देसाईगंज येथील आदर्श महाविद्यालयाला लागून असलेल्या पटांगणात सभेसाठी आले होते. २५ मे १९५७ रोजी बॅरीस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या उपस्थितीत येथील दीक्षाभूमी परिसरात दीक्षांत समारंभ पार पडला होता. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या जागेला ऐतिहासिक स्थळ म्हणून घोषीत करावे, अशी मागणी जिल्हाभरातील बौध्द बांधवांकडून होत होती. या जागेचा विकास करण्याचे काम सुरू असतानच नझूल व नगर परिषदेच्या कचाट्यात सदर जागा रखडली. अगदी सुरूवातीला दीक्षाभूमी समितीच्या ताब्यात एकूण १४ एकर जागा होती. ही जागा समितीच्या नावे हस्तांतरीत करण्यासाठी सहा हजार रूपयांचा भरणा करावा लागणार होता. मात्र तत्कालीन समिती पदाधिकारी ही रक्कम भरू शकले नाही. त्यामुळे ही जागा दीक्षाभूमी समितीच्या नावाने झाली नाही. कालांतराने या जागेवर अतिक्रमण वाढत गेले. त्यामुळे दीक्षाभूमीची जागा कमी होत गेली.
सम्यक जागृत बौध्द महिला मंडळाच्या पदाधिकाºयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक व न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार कृष्णा गजबे व वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून शिल्लक असलेली साडेचार जागा समितीच्या नावाने हस्तांतरीत करण्यास मंजुरी दिली आहे. आमदार कृष्णा गजबे यांनीही स्थानिक विकास निधीतून स्टेजकरिता सात लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
सामाजिक व न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केलेल्या प्रयत्नामुळे स्तुप बांधण्यासाठी पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. याही बांधकामास लवकरच सुरूवात होईल, अशी माहिती जागृत बौध्द महिला महामंडळाच्या पदाधिकाºयांनी दिली. यावेळी महिला मंडळाचे अध्यक्ष कविता मेश्राम, उपाध्यक्ष शामला राऊत, झूलझेबा डांगे, सचिव ममता जांभुळकर, सहसचिव जयश्री लांजेवार, सदस्य रमा बोदेले, विद्या लोखंडे, यशोदा मेश्राम, रत्नमाला बडोले, हिरा घडले, मंदा शिंपोलकर, गायश्री वाहने, शारदा मेश्राम, विश्रांती वाघमारे आदी उपस्थित होते.