गडचिरोली जिल्ह्यात दारूवर वर्षाकाठी ६४ कोटी खर्च !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 07:00 AM2020-10-11T07:00:00+5:302020-10-11T07:00:09+5:30
liquor Gadchiroli News जानेवारी २०२० मध्ये गडचिरोली जिल्ह्यात केलेल्या सँपल सर्व्हेनुसार येथील १२ लाख लोकसंख्येचा वर्षाकाठी दारूवरील खर्च ६४ कोटी रु पये आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यातील इतर जिल्ह्यांत १२ लाख लोकसंख्येमागे वर्षाला सरासरी ५०० कोटी रूपये लोक दारूवर खर्च करतात. जानेवारी २०२० मध्ये गडचिरोली जिल्ह्यात केलेल्या सँपल सर्व्हेनुसार येथील १२ लाख लोकसंख्येचा वर्षाकाठी दारूवरील खर्च ६४ कोटी रु पये आहे. दारूबंदी असल्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्यात दारूवरील खर्च केवळ १३ टक्के आहे. तोही कमी होऊ शकतो. त्यासाठी दारूबंदीची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करावी. ती उठविण्याचा विचारही करू नये, असे आवाहन पद्मश्री डॉ.अभय बंग व डॉ.राणी बंग यांनी केले.
डॉ.बंग दाम्पत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच शरद पवार, बाळासाहेब थोरात आदी नेत्यांना याबाबतचे निवेदन पाठविले. त्यात नमुद केल्यानुसार, गडचिरोली जिल्ह्यातली दारूबंदी आदिवासी नागरिक व सर्व स्त्रियांच्या हिताची आहे. कोरोनाने जिल्ह्यात माणसे मरत असताना त्यांना वाचवण्याऐवजी दारूबंदी उठविण्यासाठी तातडीने समिती गठीत करण्याचा प्रयत्न करणे चूक आहे. दारूबंदीशी नाही तर कोरोनाशी लढावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
गेली २७ वर्षे गडचिरोलीत दारूबंदी आहे. २०१६ सालापासून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाव्यापी दारू-तंबाखूमुक्ती अभियान ‘मुक्तीपथ’ सुरु आहे. परिणामी महाराष्ट्राच्या सरासरीपेक्षा या जिल्ह्यात दारूवरील खर्चाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे त्यांनी सांगितले. दारू सुरू केल्यास स्त्रियांवरील अत्याचार दुप्पट होतील, असा इशारा त्यांनी दिला.
पंचायतराज घटनादुरु स्ती, पेसा कायदा व महाराष्ट्रातील महिला धोरणानुसार आदिवासी ग्रामसभा, महिला ग्रामसभा व ग्रामपंचायतींना दारू नियमन करण्याचे अधिकार आहेत. शेकडो गावांनी दारूबंदीसाठी प्रस्ताव पारित केले आहेत. त्यामुळे दारु बंदी अधिक प्रभावी कशी करावी, हा विचार करावा, ती उठविण्याचा प्रयत्न बेकायदेशीर असल्याचे डॉ.बंग यांना वाटते.
कोरोनापेक्षा दारूबंदी मोठी आपत्ती आहे का?
दारू व तंबाखूमुळे कोरोनाचा प्रसार वाढतो. म्हणून या महामारीच्या नियंत्रणासाठी दारू विक्र ी व तंबाखू सेवन बंद करावे, अशा सूचना आरोग्य मंत्रालय, भारत सरकार व आय.सी.एम.आर. यांच्या आहेत. गडचिरोलीमध्ये कोरोना वेगाने पसरतो आहे. अशावेळी कोरोना नियंत्रणाऐवजी दारूबंदी उठविण्याचा विचार घातक आहे. शासनाला कोरोनापेक्षा दारूबंदी मोठी आपत्ती वाटते का? असा सवाल डॉ.बंग दाम्पत्याने उपस्थित केला आहे.