वर्षभरात गडचिरोलीत ६५ नक्षलवाद्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 01:12 AM2017-11-16T01:12:58+5:302017-11-16T01:13:45+5:30
राज्यात सर्वाधिक नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी नक्षली गुन्ह्यांचे प्रमाण घटले असून ६५ नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यात सर्वाधिक नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी नक्षली गुन्ह्यांचे प्रमाण घटले असून ६५ नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याशिवाय पोलीस कारवाईदरम्यान ४० चकमकी होऊन नऊ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.
पाच दिवसीय वार्षिक निरीक्षणानंतर बुधवारी त्यांनी वर्षभरातील नक्षल कारवाया आणि पोलीस विभागाने राबविलेले उपक्रम याबद्दलची माहिती पत्रपरिषदेत दिली. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपस्थित होते.
यावर्षी जानेवारी ते आतापर्यंत नक्षली कारवाया नियंत्रणात ठेवण्यात पोलीस विभागाला मोठे यश आल्याचे शिंदे यांनी सांगितले. छत्तीसगड सिमेवरील अबुझमाडच्या जंगलात पहिल्यांदाच गडचिरोली पोलिसांनी शिरून दोन वेळा नक्षलवाद्यांचे ७ घोडे जप्त केले. २० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. १३५ शस्त्रास्त्र आणि १५० किलो स्फोटकं जप्त केली. गेल्यावर्षी नक्षल्यांनी ७६ विविध प्रकारचे गुन्हे घडविले होते. यावर्षी ६२ गुन्हे झाले आहेत. गेल्यावर्षी नक्षल्यांनी १४ निरपराध आदिवासींची हत्या केली होती. यावर्षी ७ जणांची हत्या झाली.
यावर्षी नागरिकांमध्ये जागृती करण्यात यश आल्याने नक्षल सप्ताहाला नागरिकांनी प्रथमच उघड विरोध दर्शविला. त्यामुळे हा सप्ताह नक्षलविरोधी सप्ताह झाला. नक्षल चळवळीत भरती होण्यासाठी आता गडचिरोली जिल्ह्यातून कोणी तयार होत नसल्यामुळे छत्तीसगडमधील युवक-युवतींना समाविष्ट करण्याचे प्रमाण जास्त असल्याची माहितीही यावेळी उपमहानिरीक्षक शिंदे आणि पो.अधीक्षक डॉ.देशमुख यांनी दिली.
पाच दिवस झालेल्या जिल्हा पोलीस दलाच्या निरीक्षणावर डीआयजी शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.
तीन राज्यांच्या सीमेवर नवीन एओपी
नक्षल्यांचे गडचिरोली जिल्ह्यातील अस्तित्व काहीसे कमी झाले असले तरी गोंदिया-बालाघाट-राजनांदगाव या तीन राज्यांच्या सीमावर्ती जिल्ह्यांमिळून नक्षल्यांनी नवीन ठिय्या तयार केला आहे. त्याला नियंत्रणात करण्यासाठी मुरकूटडोह येथे नवीन सशस्त्र दूरक्षेत्र (एओपी) तयार करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
नागरी कृती कार्यक्रमाची व्याप्ती वाढणार
गडचिरोली जिल्ह्यात पोलीस वगळता इतर विभागांमध्ये अधिकारी-कर्मचाºयांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे नागरी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून पोलीसच ग्रामीण भागात इतर विभागांची कामेही करतात. त्यासाठी पोलीस विभागाला स्वतंत्र निधी देण्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली असल्याचे यावेळी पो.अधीक्षक डॉ.देशमुख यांनी सांगितले.
युनो आणि केंद्र सरकारने ९ आॅगस्ट हा यावर्षीपासून आदिवासी दिन पाळण्याचे जाहीर केले. त्यानिमित्ताने आदिवासींसाठी विविध स्पर्धा घेऊन त्यांच्या प्रतिभेला चालना देण्याचा प्रयत्न झाला. त्यांचे रेला नृत्य २६ जानेवारीच्या पथसंचलनात समाविष्ट करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
नक्षल कारवायांवर देखरेख करण्यासाठी ड्रोन खरेदीची प्रक्रिया सुरू असून तीन नवीन पोलीस मदत केंद्र प्रस्तावित असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली.