६९ हजारांची दारू पकडली
By admin | Published: March 20, 2017 01:26 AM2017-03-20T01:26:49+5:302017-03-20T01:26:49+5:30
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरमोरी पोलिसांनी शहरातील शेगाव टोली परिसरात प्रमोद निंबेकर याच्या घरी धाड टाकून
आरमोरी पोलिसांची कारवाई : दोघांवर गुन्हा दाखल
आरमोरी : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरमोरी पोलिसांनी शहरातील शेगाव टोली परिसरात प्रमोद निंबेकर याच्या घरी धाड टाकून येथून ६९ हजार रूपये किमतीची देशी, विदेशी दारू शनिवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास पकडली.
या प्रकरणी आरोपी प्रमोद निंबेकर, त्याची पत्नी ज्योती प्रमोद निंबेकर या दोघांवर मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलमान्वये आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी निंबेकर यांच्या घरून १४ हजार १०० रूपये किमतीची इम्पेरीयन ब्लू कंपनीच्या ४७ निपा, ३३ हजार रूपये किमतीच्या इम्पेरीयल ब्लू अथेन्टीक ग्रीन विस्की कंपनीच्या दारूच्या ११० निपा तसेच प्लास्टिकच्या चुंगळीमध्ये लपवून ठेवलेल्या देशी दारूच्या ६० निपा जप्त केल्या. सदर कारवाई आरमोरीचे पोलीस निरिक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार मुनघाटे, पोलीस हवालदार शेंडे, ताज अली सय्यद, नाईक पोलीस शिपाई कोसरे, पोलीस शिपाई हितेश जेटीवार, महिला पोलीस शिपाई आंधळे, ठाकरे आदींनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार ताज अली सय्यद करीत आहेत. आरमोरी पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहराच्या विविध वार्डातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेनेही आरमोरी तालुक्यात दारू पकडली होती. (वार्ताहर)