लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पंतप्रधान आवास योजना ग्रामीणअंतर्गत जिल्हास्तरीय अपील समितीची सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत घरकुलांसाठी पात्र असलेल्या ७३ हजार ८५२ लाभार्थ्यांच्या यादीला मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत आवास प्लस डेटाबेस (प्रपत्र ड) मधील तालुकास्तरावर पात्र लाभार्थ्यांच्या प्राधान्यक्रम यादीला मान्यता देण्यात आली.घरकुलासाठी पात्र असलेल्या ७३ हजार ८५२ लाभार्थ्यांना १०० टक्के जॉबकार्ड मॅपिंंग करण्याची कार्यवाही करण्यात आली. ग्रामसभेने प्राधान्यक्रमाने यादी तयार करून पात्र/अपात्र यादी ७ दिवस प्रसिद्धी व प्रचारासाठी ठेवली हाेती. पंचायत समिती स्तरावर आक्षेप नोंदविण्यासाठी १५ दिवस मुदत ठेवण्यात आली होती. यावेळी एकही आक्षेप प्राप्त न झालेल्या प्रस्तावना ग्रामसभेने दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार मंजुरी देण्यात आली. जिल्हास्तरीय अपील समितीच्या या सभेला समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक राजेंद्र भुयार, स्पर्श संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक डॉ. दिलीप बारसागडे उपस्थित होते.
७ हजार ३६० घरे बांधणार २०२१-२२ या वर्षात जिल्ह्याला ७ हजार ३६० घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. काही घरकूल दाेन ते तीन वर्षांचा कालावधी संपूनही पूर्ण हाेत नाही. त्यामुळे केंद्र शासनाने याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. निश्चित कालावधीत घराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न हाेणार आहेत.