वडसातील ८७ अंगणवाडी केंद्र बनले डिजिटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:17 AM2019-05-25T00:17:52+5:302019-05-25T00:18:19+5:30
केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे आयईसीडीएस प्रणालीला मजबूत करण्यासाठी व पोषण सुधार करण्याकरिता संपूर्ण भारतभर ‘राष्ट्रीय पोषण मिशन’ च्या माध्यमातून आयसीडीसी-कॅश (कॉमन अप्लिकेशन सॉफ्टवेअर) विकसीत करण्यात आले आहे.
विष्णू दुनेदार।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुळशी : केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे आयईसीडीएस प्रणालीला मजबूत करण्यासाठी व पोषण सुधार करण्याकरिता संपूर्ण भारतभर ‘राष्ट्रीय पोषण मिशन’ च्या माध्यमातून आयसीडीसी-कॅश (कॉमन अप्लिकेशन सॉफ्टवेअर) विकसीत करण्यात आले आहे. याची तालुकास्तरावर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाकडे देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन, सिमकार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच ८७ अंगणवाडी केंद्र डिजिटल बनले आहेत.
देसाईगंज तालुक्यात एकूण ८७ अंगणवाडी केंद्र असून सर्व केंद्रातील अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन व सिमकार्ड देण्यात आले. शिवाय दर तीन महिन्यांकरिता नेट रिचार्जसाठी प्रत्येक अंगणवाडी सेविकेला ४०० रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन हाताळणीचे ज्ञान अवगत करणे आवश्यक आहे. यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण चार टप्प्यात दिल्या जाणार आहे. प्रशिक्षणाचा एक टप्पा देसाईगंज तालुक्यात पूर्ण झाला आहे.
एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी एन.ए. कुचिक यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका आशा वानखेडे, गट समन्वयक विशाल शिंदे, मुख्य प्रशिक्षक देवांगना साखरकर, सविता बुद्धे, दीक्षा मेश्राम हे अंगणवाडी सेविकांना मोबाईल प्रशिक्षण देत आहेत.
कॅश हे एक मोबाईल अप्लिकेशन असून त्याद्वारे अंगणवाडी केंद्राच्या प्रत्येक लाभार्थीची आॅनलाईन नोंद करणे, रियल टाइम डेटाचा उपयोग करताना रिपोर्ट व डॅशबोर्ड प्रदान करणे, सेविकाद्वारे प्रदान करण्यात येणाऱ्या सेवांच्या गुणवत्तेचा पाठपुरावा करताना आवश्यक सुधारणा करणे, लाभार्थ्यांना पोषण व स्वास्थ्य स्थितीबाबत अलर्ट संदेश पोहचविणे, सेविकांमार्फत वापरात असलेले सर्व रजिस्टर बंद करणे व त्यांच्या कामाची क्षमता वाढविणे, इतर विभागासोबत डिजिटल समन्वय राखणे आदी कामे याद्वारे होणार आहेत. एकूणच अंगणवाडी केंद्राचा कारभार आता हायटेक होणार आहे.
११ रजिस्टरमध्ये नोंदवावी लागत होती माहिती
पूर्वी अंगणवाडी सेविकांना वेगवेगळ्या ११ रजिस्टर मध्ये माहिती लिहून ती प्रकल्प स्तरावर सादर करावी लागत असे. हे काम वेळखाऊ व खूप जिकीरीचे होते. परंतु आता अंगणवाडी सेविका मोबाईलद्वारे पोषण आहार स्थिती, कुटुंब व्यवस्थापन, दैनिक आहार, गृहभेट नियोजन, वाढ देखरेख, शिधा वाटप नोंद, अंगणवाडी केंद्र व्यवस्थापन, मासिक प्रगती अहवाल आदी माहिती रजिस्टरमध्ये नमूद करावी लागत होती. मात्र आता ही सर्व माहिती कॅश अप्लिकेशनद्वारे आॅनलाईन भरण्यात येणार आहेत. त्यामुळे खºया अर्थाने आता अंगणवाड्या डिजिटल बनणार आहेत. सेविकांच्या कामात आता गती येणार आहे.
सुरूवातीला ज्या सेविकांना स्मार्ट फोन वापराबद्दल माहिती नव्हती. त्यांच्या मनात याबाबत थोडी भीती होती. परंतु प्रशिक्षकामार्फत प्रत्येक सेविकेला समजेल, अशा भाषेत समजावून सांगितले जात असून याकरिता प्रोजेक्टरचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे सेविकेच्या मनातील भीती कमी झाली असून त्या चांगल्या प्रकारे स्मार्ट फोन हाताळत आहेत.
- निर्मला कुचिक,
बालविकास प्रकल्प अधिकारी, देसाईगंज